अकोला - सामाजिक बांधिलकी जोपासणार्या कस्तुरी संस्थेच्या वतीने मे कामगार दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. सामाजिक वसा जोपासणार्या दिव्य मराठीच्या साक्षीने आज दिव्य मराठीच्या कार्यालयात कॅन्सरग्रस्त तीन वर्षीय चिमुकलीला उपचारासाठी ११ हजारांचा धनादेश देण्यात आला.
कस्तुरी संस्थेमार्फत कामगारदिनी घरोघरी धुणीभांडी करणार्या मोलकरणींचा मान्यवरांच्या हस्ते साडीचोळी देऊन गौरव करण्यात येतो. यंदाही तसेच काहीसे नियोजन होते. मात्र, कस्तुरीने शेगाव मार्गावर उभारलेल्या संत गजानन मंदिरात कस्तुरीचे संस्थापक प्रा. किशोर बुटोले यांना पातूर तालुक्यातील बेलुरा खुर्द येथील गोपाल घेघाटे भेटले. त्यांनी
आपल्या तीन वर्षाची चिमुकली रश्मीला डोळ्यांचा कॅन्सर झाल्याचे सांगून काही मदत होऊ शकते का म्हणून विचारणा केली. प्रा. बुटोले यांनी विचार करून कामगार दिनानिमित्त आयोजित होणार्या सोहळ्यातील हारतुर्यांचा खर्च एका गरजू चिमुकलीच्या उपचारार्थ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज मे महाराष्ट्रदिनी दिव्य मराठीच्या अमानखाँ प्लाॅटमधील कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
रश्मी घेघाटेचे वय तीन वर्ष असून, ती दीड वर्षांची असतानापासून तिच्या डोळ्याच्या कॅन्सरवर उपचार सुरू आहेत. येत्या काही दिवसांमध्ये एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट, हैदराबाद येथे तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्या दृष्टीने अल्पशी मदत म्हणून कस्तुरीच्या सदस्यांनी ११ हजारांचा धनादेश रश्मी तिचे वडील गोपाल घेघाटे यांना सुपूर्द केला. दिव्य मराठीचे युनिट हेड प्रवीण ससाणे यांच्या हस्ते रश्मी घेघाटेला हा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी दिव्य मराठीचे कार्यकारी संपादक सचिन काटे यांच्यासह कस्तुरीचे डॉ. के. एस. घोरपडे, प्रा. कैलास वानखडे, माधव मुंशी, शशिकांत बांगर, राजेश्वर पेठकर, प्रा. मेघा कनकेकर, प्रा. अश्विनी ठाकरे, अनिल पालवे, संजय ठाकरे आदी उपस्थित होते.
‘अंकल माझा फोटो खच्चाक्...’ : रश्मीदोन वर्षांपासून कॅन्सरचा सामना करत असून, तिच्यावर १२ किमोथेरपी, लेझर ट्रिटमेंट झाल्या आहेत. तसेच अजून किमोथेरपी लेझर ट्रिटमेंटची शक्यता आहे. मात्र, एवढा त्रास सोसूनही तिच्या चेहर्यावर निरागस हास्य होते. कार्यालयात ती हसत-हसत बागडत होती. तसेच कॅमेरा पाहताच तिने ‘अंकल माझा फोटो खच्चाक्’ असे म्हणत फोटोसाठी आग्रह धरला.
(फोटो : कस्तुरी संस्थेच्या वतीने चिमुकलीला धनादेश देण्यात आला.)