आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारची भिंतीला धडक; तीन ठार, दोन जण गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर - जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून अकोला येथे साक्षगंधासाठी जाणारी कार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूरनजीक वाघूड फाट्याजवळ एका दुकानाला धडकून झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दत्तात्रय धनराज घोंगडे (वय ५५), श्रीकृष्ण धनराज घोंगडे (वय ५२) रा. द्वारकादर्शन काॅलनी, जामनेर या दोन भावांसह भागवत शेनफड गिते (वय ६५) रा. जामोद हे जागीच ठार झाले. बाबूराव धनराज घोंगडे (वय ६०) रा. कुऱ्हाड, ता. पाचोरा सुदाम भिका चौधरी (वय ३२) रा. कुऱ्हाड खुर्द हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव खान्देश येथे हलवण्यात आले आहे.

अपघातातील मृतक जखमी जामनेर येथून अकोला येथे संतोष भिका चौधरी यांचा मुलगा विजय याच्या साक्षगंधासाठी होंडा आयकाॅन ट्वेंटी कारद्वारे (एमएच-१९ बीजे-४८९१) जात होते. मलकापूर शहर अोलांडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाघूड फाट्यानजीक चालक तथा मालक दत्तात्रय घोंगडे यांचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या संतकृपा नामक सलूनच्या भिंतीवर जोरदार धडकली. या घटनेसंदर्भात संतोष भिका चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालक तथा मालक दत्तात्रय धनराज घोंगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलिस अधिकारी रूपाली दरेकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सख्ख्या भावांचा मृत्यू, एक गंभीर
अपघातामध्ये दत्तात्रय धनराज घोंगडे, श्रीकृष्ण घोंगडे हे सख्खे भाऊ ठार झाले. दत्तात्रय घोंगडे हे मुक्ताईनगर येथील आयडीबीआय बँकेमध्ये कार्यरत होते. दरम्यान, मृतकांचा तिसरा भाऊ बाबूराव (बळीराम) धनराज घोंगडे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, या अपघातातील तिसरा मृतक भागवत शेनफड गिते हे मलकापूर येथील कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होते.

कारच्या धडकेने भिंत पडली
कारची धडक एवढी जबर होती की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या लगत असलेल्या संतकृपा कम्युनिकेशन (सलून) या दुकानाची भिंत अक्षरश: पडली. यावरून या अपघाताच्या भीषणतेची कल्पना येते.