अकोला - वसंत देसाई क्रीडांगणावर वाढलेले गाजर गवत जिल्हा काँग्रेस क्रीडा सेलच्या पदाधिकार्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांना 5 मे रोजी भेट दिले. काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकार्यांनी मैदानावरील गाजर गवत काढून मैदान स्वच्छ केले.
वसंत देसाई क्रीडांगणावर शहरातील अनेक लोक सकाळी व सायंकाळी नियमित व्यायाम करण्यासाठी तसेच फिरण्यासाठी येतात. तसेच अनेक खेळाडू सरावासाठी येतात. बर्याच दिवसांपासून मैदानाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे परिसरात गाजर गवत वाढले. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांचा व खेळाडूंचा विचार करून सेलतर्फे मैदानाची स्वच्छता करण्यात आली. या वेळी सेलच्या पदाधिकार्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्यासोबत अनेक समस्यांवर चर्चा केली. क्रीडांगणाच्या परिसरात पथदिवे नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तसेच खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा नाहीत अशा अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. याशिवाय क्रीडांगणावर विद्यार्थ्यांच्या, खेळाडूंच्या दृष्टीने चांगल्या सोयी उपलब्ध करण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली. या वेळी क्रीडा प्रशिक्षक बुढन गाढेकर, तालुकाध्यक्ष अय्युब खान, जिल्हा सचिव सचिन इंगोले, संजय सावळे, संदीप सायरे, राहुल इंगोले, युसूफ सुखीवाले, मोहम्मद उस्मान भाई, शैलेश काळणे, प्रमोद चव्हाण, प्रवीण अवाळे आदी उपस्थित होते.