आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला विचारून युती केली का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - निवडणुकीत प्रचारादरम्यान तसेच मतदानाच्या वेळी अनेक मजेदार किस्से घडतात. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी असाच मजेदार प्रसंग घडला.
२००४ पर्यंत बोरगावमंजू विधानसभा मतदारसंघ कायम होता. त्यामुळे अकोला पूर्व व अकोला पश्चिम, असे दोन मतदारसंघ नव्हते. केवळ अकोला मतदारसंघ होता. परंतु, २००९ च्या निवडणुकीत बोरगावमंजू विधानसभा मतदारसंघ रद्द करण्यात आला. त्या जागी अकोला पूर्व व अकोला पश्चिम असे मतदारसंघ अस्तित्वात आले. अकोला विधानसभा मतदारसंघ हा केवळ अकोला शहरापुरता मर्यादित होता. परंतु, अकोला पूर्व अस्तित्वात आल्यावर शहराचा मोठा भाग या मतदारसंघाला जोडण्यात आला. १९९५ पासून बोरगावमंजू शिवसेनेकडे, तर अकोला भाजपकडे आहे. त्यामुळे पुढे अकोला पूर्व शिवसेनेकडे राहिला.
मतदानाच्या दिवशी उमरी-जठारपेठ भागातील मतदान केंद्रात एक ज्येष्ठ नागरिक सपत्नीक मतदान केंद्रावर पोहोचले. मतदानाच्या रांगेतही उभे राहिले. इलेक्ट्रॉनिक्स वोिटंग मशीनपर्यंत पोहोचले. परंतु, त्यांना ज्या पक्षाला मतदान करायचे होते. त्या पक्षाचे चिन्ह त्यांना मशीनमध्ये दिसेना. त्यामुळे त्यांनी मतदान अधिकाऱ्याला प्रश्न केला. मला या पक्षाला मतदान करायचे आहे. परंतु, त्या पक्षाचे चिन्ह वोटिंग मशीनमध्ये नाही, हा काय प्रकार आहे. ज्येष्ठ नागरिक महोदयांचा हा प्रश्न ऐकून मतदान केंद्रात उपस्थित सर्वच अवाक् झाले.
अखेर मतदान केंद्रात कार्यरत एका पक्षाच्या कार्यकर्त्याने त्यांना सांगितले. आजोबा या मतदारसंघात तुम्ही जो पक्ष म्हणताय, त्या पक्षासोबत आमची युती आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षाला मतदान करा. कार्यकर्त्यांच्या उत्तरामुळे आजोबांचे समाधान, तर झालेच नाही. मात्र, आजोबा चांगलेच भडकले आणि रागारागात म्हणाले की, तुम्हाला वाटेल तेव्हा युती करता, युती करताना आम्हाला विचारले होते का? आजोबांच्या या प्रश्नाचे उत्तर देणे संबंधित कार्यकर्त्याला शक्य नव्हते. मात्र, या घटनेची चर्चा अनेक िदवस चालू राहिली.