आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जातपडताळणी’चा कारभार वार्‍यावर, नागरिक त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आवश्यक असणारे जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी जातपडताळणी विभागातील संशोधन अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत आहे, असा आरोप जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. या विभागात दलालही सक्रिय असल्याने येथे चेहरा पाहून कामे करण्यात येत असल्याचे भारिप बहुजन महासंघाने निवेदनात नमूद केले आहे.

जातपडताळणी समितीकडे अर्जदारांनी अनेक दिवसांपासून अर्ज दाखल केले आहेत. परंतु, या विभागातील काही अधिकारी त्यांना डावलून इतरांची कामे करत आहे. ही समिती उमेदवारांच्या अनेक प्रकरणात अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाने केला आहे. संबंधित त्रुटीची पूर्तता करूनही जातपडताळणी विभागातील अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. शासनाच्या निकषानुसार कुठल्याही प्रस्तावामध्ये संपूर्ण प्रस्तावाची तपासणी करून एकाच वेळेस सर्व त्रुट्या संबंधितास कळवणे गरजेचे आहे. परंतु, समिती प्रमाणपत्रांमध्ये नागरिकांच्या टप्प्याटप्प्याने त्रुट्या काढून वेठीस धरत आहेत. 16 नोव्हेंबरला उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे. त्रुटीची पूर्तता केल्यावरही पुन्हा नव्याने त्रुटी काढून ही समिती उमेदवारांना अडचणीत आणत आहे, असा आरोप केला आहे. पहिल्यांदा त्रुटी पाठवताना सर्व त्रुट्या नमूद करणे आवश्यक आहे. परंतु, असे न करता ऑनलाइन टाकलेल्या त्रुट्या आणि तहसील कार्यालयात पाठवलेल्या प्रस्तावाच्या त्रुट्यांमध्ये तफावत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

समितीची मनमानी
जातपडताळणी विभागातील काही अधिकारी जाणीवपूर्वक त्रुटी काढत आहेत. योग्यरीत्या प्रस्ताव पाहिला जात नसून, संशोधन अधिकार्‍यांमध्ये समन्वय नाही. याचा त्रास नागरिकांना होत आहे. या प्रकारामुळे उमेदवारांना अर्ज दाखल करताना अडचण निर्माण होऊ शकते. पराग गवई, माजी जिल्हा प्रसिद्धिप्रमुख, भारिप-बमसं.

समन्वयाचा अभाव
जातपडताळणी समिती विभागातील अधिकार्‍यांनी मनमानी पद्धतीने कारभार चालवला आहे. त्यांच्या मनमानीविरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली आहे. प्रशासनाने न्याय द्यावा, अशी अपेक्षा आहे. विकास सदांशिव, जिल्हा उपाध्यक्ष भारिप-बमसं.