आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBSE News In Marathi, Emrold, News Delhi, Divya Marathi, Akola

अखेर दिशाभूल थांबली;एमरॉल्ड’ने पुसली फलकावरील ‘सीबीएसई अँफिलेशन’ची अक्षरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘एमरॉल्ड’च्या राऊतवाडी, केशवनगरातील शाळेच्या मुख्य फलकावर सीबीएसई अँफिलेशनचा दावा शुक्रवारपर्यंत केलेला होता. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने शनिवार, 12 एप्रिलच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच शाळेने हा पोकळ दावा दुपारपर्यंत ‘खोडला’ होता. ‘एमरॉल्ड’च्या गीतानगर येथील एकाच शाळेला सीबीएसई अँफिलेशन आहे, असे असताना नियमबाह्यपणे त्यांनी इतर शाळांना अँफिलेशन असल्याचा दावा विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीला करण्याचा प्रयत्न केला. इतर शाळांच्या फलकावर नियमबाह्यपणे त्यांनी अँफिलेशन असल्याचा दावा केला होता. परिणामी, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)शी संलग्नित नसताना पालकांची दिशाभूल होत होती. त्यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शनिवारी एमरॉल्ड स्कूलच्या दोन्ही शाळांवरील फलक बदलवले, हे विशेष. दरम्यान, यामुळे पालकांची होणारी दिशाभूल थांबली.


ज्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न आहे. अशा शाळांची गुणवत्ता चांगली आहे, असे पालकांना वाटते. शाळेवरील सीबीएसईचा फलक पाहून पालक त्याच शाळेमध्ये पाल्याच्या प्रवेशासाठी वाट्टेल ते करतात. त्याचा फायदा घेऊन शहरातील अनेक शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न शिकवला जात असून,सीबीएसईसोबत या शाळांचा काहीही संबंध नसल्याचे वेबसाइटवरून स्पष्ट झाले. शहरामध्ये गीतानगर येथील एमरॉल्ड हॉइट्स स्कूल, बाभुळगाव येथील जवाहरलाल नवोदय विद्यालय, कुंभारी येथील ज्युबिली इंग्लिश स्कूल आणि हिंगणा कौलखेड येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स, या चारच शाळांला सीबीएसईचा दर्जा आहे. दरम्यान, राऊतवाडी आणि केशवनगरातील एमरॉल्ड स्कूलच्या शाळेमध्ये सीबीएसई शाळा असल्याचा दावा निर्माण केला गेला होता. या माध्यमातून पालक विद्यार्थ्यांची दिशाभूल होत होती. दरम्यान, शनिवारी राऊतवाडी आणि केशवनगर येथील एमरॉल्ड स्कूलवर सीबीएसई संलग्नित असल्याचा फलक पुसून टाकण्यात आला आहे.


फसवणूक करणार्‍या शाळांपासून पालकांनी सावध राहावे
पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश करताना आपली फसवणूक तर होत नाही, याची खात्री करावी. ज्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न आहे, असे सांगितले जाते, त्या शाळेबाबत सखोल चौकशी करावी. सीबीएसई पॅटर्न शिकवला जातो म्हणून भरपूर शिक्षण शुल्क आकारून पालकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. सीबीएसई पॅटर्नची परीक्षा स्टेट बोर्ड कसे घेते, असा प्रश्न शाळांना पालकांनी करावा, असे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.


नर्सरीचे प्रवेश करताना शाळा म्हणतात, सीबीएसई पॅटर्न शिकवतो
नर्सरीमध्ये प्रवेश देताना अनेक शाळा नर्सरीमध्ये सीबीएसई पॅटर्ननुसार शिकवले जाते, असे सांगतात. आणि पहिल्या वर्गात गेल्यानंतर मुलाचा परफॉर्म ठीक नसल्याचे सांगून त्याला स्टेट बोर्डासाठी प्रवेशित करतात. ही एकप्रकारे पालकांची दिशाभूल आहे.


सीबीएसईच्या नियमानुसार दिले जाते तीन प्रकारचे संलग्नीकरण
प्रोव्हिजनल अँफिलिएशन - या प्रकारात भौतिक सुविधांची पूर्तता करणार्‍या शाळांना तीन वर्षांसाठी प्रोव्हिजनल संलग्नीकरण दिले जाते. या काळात शाळांनी निकषांची पूर्तता केली तर त्यांना पर्मनंट संलग्नीकरण केले जाते. मात्र, निकषांची पूर्तता करण्यास अपयशी ठरले, तर या शाळांना 3-5 वर्षांची मुदतवाढ दिली जाते. तरीही निकष पूर्ण केले नाही, तर संलग्नीकरण रद्द केले जाते.


रेग्युलर अँफिलिएशन - शासकीय, शासन अनुदानित, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आदी शाळांला एकदाच कायमस्वरूपी रेग्युलर अँफिलिएशन दिले जाते. या शाळांना पुन्हा संलग्नीकरण घेण्याची गरज नसते.
पर्मनंट अँफिलिएशन - प्रोव्हिजनल अँफिलिएशन मिळवणार्‍या शाळांना तीन वर्षांनंतर पर्मनंट अँफिलिएशन मिळते.


चौकशी करूनच शाळेत प्रवेश घ्यावा
सीबीएसईच्या वेबसाइटवर केवळ अँफिलिएटेड शाळांची यादी आहे. मात्र, प्रोव्हिजनल अँफिलिएशन क्रमांक असेल तर तो वेबसाइटवर टाकून संलग्नीकरणची तपासणी करता येते. त्यासाठी अँफिलिएशन क्रमांकांची पालकांनी शाळेकडे मागणी करावी, जेणेकरून पालकांची दिशाभूल होणार नाही.