आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ लाखांत तयार स्वदेशी कापूस वेचणी यंत्र, ट्रॅक्टर सोबत जोडण्याची सोय उपलब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- बाजारात सुमारे दाेन काेटींपर्यंत किंमत असलेले कापूस वेचणी यंत्र स्वदेशी बनावटीने केवळ चार लाखांत तयार करण्याची किमया नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ गौतम मजुमदार यांनी साधली अाहे. या यंत्रामुळे चार तासांत एक हेक्टरवरील (अडीच एकर) वेचणी पूर्ण हाेत असून त्यात काडीकचऱ्याचे प्रमाणही नगण्य राहते, असा दावा त्यांनी केला अाहे.
स्वदेशी कापूस वेचणी यंत्र हाताळायला सोपे असून ते चालवायला कोणत्याही तांत्रिक कौशल्याची गरज नाही. देखभाल-दुरुस्तीचा खर्चही नाही. याचे सुटे भागही सहज उपलब्ध आहेत. या यंत्रात प्री-क्लीनर लावल्यामुळे काडीकचरा निघून स्वच्छ कापूस मिळतो, असे मजुमदार यांनी सांगितले. या यंत्राद्वारे झाडांचे नुकसान केवळ दोन टक्के होते. याउलट विदेशी कापूस वेचणी यंत्र हे फक्त मोठ्या रांगांमध्ये वेचणी करू शकते. ते चालवण्यासाठी उच्च प्रशिक्षित चालक लागतो.

देखभाल-दुरुस्तीचा खर्चही खूप येतो. सुटे भाग सहज उपलब्ध हाेत नाहीत तसेच प्री-क्लीनर सोबत मिळत नाही. यात वेचणी करताना झाडांचे नुकसान सुमारे १५ टक्के होते, असे मजुमदार यांनी स्पष्ट केले.

गौतम मजुमदार
नागपूरच्या केंद्रीय संशाेधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ गौतम मजुमदार यांनी तयार केलेले स्वदेशी बनावटीचे यंत्र.


खर्च कमी हाेईल
पंजाबमधीलसधन शेतकऱ्यांकडे ३० ते ४० लाखांत येणारी आणि तीन तासांत एक हेक्टरमधील कापूस वेचणी करून देणारी यंत्रे आहेत. चार ते पाच शेतकरी मिळून एक मशीन विकत घेतात अाणि पंजाब, मध्य प्रदेश महाराष्ट्रात येऊन कापूस वेचणीची कामे करतात. येथून मोठी कमाई करून परत जातात. अत्यल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही मशीन घेणे परवडत नाही अाणि दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने कापूस वेचणीत अडचणी निर्माण हाेतात. स्वदेशी वेचणी मशीनमुळे त्यांची अडचण दूर हाेणार असल्याचा दावा मजुमदार यांनी केला.
विदेशी ट्रॅक्टर कंपनीचे कापूस वेचणी यंत्र दहा वर्षांपूर्वी १.२ कोटीचे होते. आता त्याची किंमत दोन कोटींच्या जवळपास आहे. त्यावर ३७ लाख सबसिडी दिली जाते. आकारानेही ते अवाढव्य आहे. त्या तुलनेत मजुमदार यांनी तयार केलेले यंत्र आकाराने लहान असून अत्यल्प तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता परवडणारे आहे. या यंत्रात आणखी काही माॅडिफिकेशन करण्यात येणार आहे. ही मशीन ट्रॅक्टर माउंटेड करण्यात येईल. त्यामुळे ट्रॅक्टरसोबत सहज जोडता येईल, असे संशाेधन केंद्राचे संचालक डाॅ. केशव क्रांती यांनी सांगितले. या यंत्राच्या व्यावसायिक निर्मितीसाठी महिंद्रा ट्रॅक्टरशी बोलणी सुरू असून इतरही कंपन्या उत्सुक अाहेत.