आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- साईनगर परिसरातील नित्यानंद कॉलनीत राहणार्या एक शिक्षिकेचे एक लाखाचे मंगळसूत्र बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घराच्या परिसरातच दुचाकीवर आलेल्या भामट्याने हिसकावून पळ काढला. त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. 18 ऑगस्टपासून मंगळसूत्रचोरीची शहरातील ही अकरावी घटना आहे. आतापर्यंत सहा लाख 65 हजारांचे सोने भामट्यांनी लुटले आहे.
मंजूषा प्रमोद देशमुख (45) असे शिक्षिकेचे नाव आहे. त्या स्कूल ऑफ स्कॉलर्सला शिक्षिका आहेत. सकाळी शाळेत जाण्यासाठी त्या घरापासून पायी चालल्या होत्या. नित्यानंद कॉलनीच्या पाटीजवळ काळ्या दुचाकीवर एक भामटा आला. त्याने देशमुख यांच्या बाजूने नेत खड्डय़ातील चिखल देशमुख यांच्या अंगावर उडवला. त्या अंगावरील चिखल झटकत असतानाच पुढे गेलेल्या भामट्याने दुचाकी वळवून गळ्यातील 35 ग्रॅमचे मंगळसूत्र हिसका मारून लंपास केले. परिसरातील एका युवतीने दुचाकीचा क्रमांक टिपला. 6558 असा तो क्रमांक आहे. देशमुख यांच्या तक्रारीनंतर बडनेरा पोलिसांनी या क्रमांकाच्या दुचाकींचा शोध सुरू केला आहे. या चोरीप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात 18 ऑगस्टपासून सातत्याने मंगळसूत्रचोरी होत आहे. मात्र, चोरटे पोलिसांना अद्याप गवसले नाहीत. महिलांनीच आता सक्षमपणे या भामट्यांचा सामना करून त्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.