आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटा बदलण्याबाबत नागरिकांमध्ये गैरसमज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एक जुलैपासून 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात येणार असल्या तरी, त्या बदलून मिळणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. परंतु, रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही लोकांनी बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी केली होती. नोटा बदलण्याबाबत नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यात बँक कर्मचार्‍यांची दमछाक होत आहे.
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2014 पासून लोकांनी 2005 पूर्वीच्या चलनी नोटा राष्ट्रीयीकृत बँकांकडून बदलण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे. प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकेत तशी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. मात्र, रिझर्व्ह बँकेचे आदेश स्पष्ट असूनही सामान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरसमज आहेत. काही बँकांच्या शाखांमध्ये लोकांनी नोटा बदलण्यासाठी गर्दी केली आहे. अनेकांनी केवळ चौकशीसाठी केलेल्या गर्दीमुळे माहिती देण्यातच बँक कर्मचार्‍यांची दमछाक उडत आहे. शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या अनेक शाखा आहेत़
मात्र, अद्यापपर्यंत बँकांना नोटा बदलून देण्याबाबत सूचना नसल्याचे बँक अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नोटा आता बदलून देता येणार नाहीत़ त्याबाबत सूचना लावली जाईल, असे बँकेतील अधिकार्‍यांनी सांगितले. लोकांनी घाबरून जाऊ नये, नोटा बदलून मिळण्यास अजून बराच वेळ आहे, सर्वांना नोटा बदलून मिळतील, शाखेमध्ये तशा सूचना लावल्या जातील़ त्यामुळे बँकेत गर्दी करू नये, असे आवाहन बँकांतर्फे करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने 2005 पूर्वीच्या नोटा बदलून घेण्यास सांगितले असले तरी, नागरिकांना यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. बँकेतील रोजच्या व्यवहारात हे काम होणार असून, नोटा बदलण्याची जबाबदारी ग्राहकांपेक्षाही सर्वच बँकांची असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी धावपळ करण्याची गरज नसल्याचे मत बँक अधिकार्‍यांनी व्यक्त केले.
काळा पैसा कमी व्हावा आणि जुन्या फाटक्या, मळलेल्या नोटा कमी पैसे देऊ न बदलून देण्याच्या व्यवसायास आळा बसावा तसेच बनावट नोटा चलनातून बाहेर पडाव्या या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.
बँक व्यवहारातून वेगळ्या होणार नोटा
काळा पैसा कमी होण्यासाठी निर्णय?
7,351 कोटी नोटा चलनात
आरबीआयच्या आकडेवारीनुसार 31 मार्च 2013 अखेरीस देशात विविध मूल्यांच्या एकूण 7,351 कोटी नोटा चलनात होत्या. त्यापैकी 14.6 टक्के नोटा 500 रुपयांच्या, तर 5.9 टक्के नोटा एक हजार रुपयांच्या होत्या.
ओळखपत्र राहणार सक्तीचे
जुन्या, फाटक्या तसेच मळलेल्या नोटा बँकांतून बदलून घेताना नोटांची संख्या 10 पेक्षा अधिक असेल, तर संबंधित व्यक्तीला बँकेत ओळखपत्र सादर करावे लागेल. नोटा बदलून घेणार्‍यांसाठी ओळखपत्र आवश्यक असल्याचे सांगितले जाते. 2005 पूर्वी छापलेल्या 500 व 1000 सह सर्व नोटा चलनातून बाद होणार आहेत.