आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात खड्ड्यामुळे गेला चिमुकल्याचा जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील अशोक वाटिका चौकात खड्ड्यांमुळे दुचाकी स्लिप होऊन ट्रकखाली आल्याने झालेल्या अपघातात चिमुकला जागीच ठार झाला. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजता ही घटना घडली. अपघाताला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत आप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
अशोक वाटिका चौकात १८ फेब्रुवारी रोजी सिग्नल लागल्यावर एमएच ३० - एडी ९७७६ क्रमांकाची दुचाकी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली. अचानक दुचाकी खड्ड्यात आदळून स्लिप झाल्याने मागून येणाऱ्या एमएच ३० - एबी २३०९ क्रमांकाच्या ट्रकखाली आली. यात दुचाकीवरील तीन वर्षीय श्री उर्फ अथर्व जागीच ठार झाला, तर काका डॉ. याेगेश हरिश्चंद्र उजाळे (वय ३५) त्यांची आई मथुराबाई उजाळे (वय ५८) हे दोघे गंभीर जखमी झाले.
दोघांच्याही मांडीला जबर मार लागला असून, त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने प्रत्यक्षदर्शींनी ट्रक अडवला. मात्र, ट्रकचालक फरार झाला. याप्रकरणी भिकाजी महादेवराव उजाळे रा. पावसाळे लेआउट कौलखेड, अकोला यांनी खदान पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालक शेख साबिर शेख हनी याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मनपाप्रशासनाविरुद्ध आपची तक्रार
आप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्यासाठी तसेच फुटलेली पाइपलाइन दुरुस्तीसाठी १७ फेब्रुवारीलाच अशोक वाटिका चौकात बैठे आंदोलन केले. मात्र, या आंदोलनाची कुठलीही दखल महापालिका प्रशासनाने घेतली नाही.
खड्डा पाण्यामुळे हा अपघात घडून आला. या प्रकारास स्थानिक लोकप्रतिनिधी आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप करत आप संघटनेेचे जिल्हा समन्वयक संदीप जोशी कार्यकर्त्यांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी आयुक्तांसह संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन

घटनास्थळी दाखल झालेले वाहतूक पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार यांनी माणुसकी दाखवत अशोक वाटिका चौकातील खड्डे बुजवण्यासाठी सहकारी पोलिसांना सांगितले. महापालिका प्रशासनाला १५ दिवसानंतरही जाग आली नाही, पण अपघात घडल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत खड्डे बुजवले.
काही वेळ तणाव

अपघातझाल्यानंतर अशोक वाटिका चौकात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार, खदान पोलिस ठाण्याचे निरीक्षक सी. टी. इंगळे यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.