आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात चिमुकल्यांना मिळतेय आता खेळण्यांमधूनही शिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सध्या खेळण्यांचे प्रकार काळानुसार बदलत चालले आहे. आधीचे खेळ पडद्याआड जाऊन नवनवीन शैक्षणिक खेळणे घेण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच मुलांना काहीतरी शिकता येण्यासाठी ही खेळणी उपयुक्त ठरत आहेत.

मुलांच्या बौद्धिक विकासाबाबत पालक अधिक जागरूक झाले आहेत. सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेत आपल्या मुलांनी टिकावे यासाठी त्यांना खेळातून ज्ञान प्राप्त व्हावे, ही प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे. मुलांच्या वयानुसार विविध प्रकारची खेळणी उपलब्ध असली तरी, अनेक वेळा पालक अगदी लहानपणीच त्यांच्यासाठी बौद्धिक खेळण्यांची मागणी करतात. लहान मुलांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी शारीरिक कसरत घडवणारे निरनिराळे खेळही बाजारात उपलब्ध आहेत. काही महिन्यांच्या रांगत्या बाळाला गतिशील करण्यासाठी आगळावेगळा चेंडू आला असून, हसतखेळत बाळाच्या शारीरिक विकासाला चालना मिळते. त्यांना प्रत्येक नवीन गोष्ट शिकताना त्रास होऊ नये, याची विशेष काळजी घेऊन खेळांची निर्मिती केली आहे. नवजात मुलांच्या खेळण्यांचे बाजारात 200-250 प्रकार आहेत. यावरून आपण विचार करू शकतो की, वयोगटानुसार खेळण्यांचे किती विविध प्रकार असतील. लहान मुलांच्या जुन्या प्रकारच्याच खेळण्यांना नवीन आकार आणि थोडा बदल करून त्यात आकर्षकता निर्माण केली आहे. डोरेमॉन, छोटा भिमला लहान मुलांची जास्त मागणी आहे. मुलींसाठी नेहमीचेच खेळ असले तरी बाहुल्यांची जागा बार्बी डॉलने घेतली. याशिवाय त्यांच्यासाठी ज्वेलरी गेम यांसारखे क्रियाशीलतेला वाव देणारे खेळही आले आहेत. तीनचाकी सायकलला आकर्षक रूप देण्यात येऊन ट्विस्टर या सायकलला जास्त मागणी आहे. व्यावसायिक पेशाशी निगडित इंजिनिअर्स सेट, डॉक्टर्स सेट असे खेळ लहानपणीच मुलांना देऊन त्यांच्यात याविषयी आवड निर्माण केली जाते. मैदानी खेळाची जागा आता बैठय़ाखेळांनी घेतली आहे.

प्रयोगातूनच शिकतात मुले
मुलांना एखाद्या गोष्टीचे पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नसते. कुठलीही गोष्ट स्वत: करून बघितल्यास, प्रयोग केल्यास नेहमीसाठी स्मरणात राहते. विज्ञानातील प्रयोग जोपर्यंत ते स्वत: करून पाहणार नाही तोपर्यंत त्यातील बारकावे समजत नाही. मुलांना खरे ज्ञान प्रयोगातूनच मिळते.
-संदीप खरे, संचालक-बाल जगत

मुलांच्या वयाचा विचार व्हावा
मुलांच्या वयानुसार खेळांची निर्मिती झालेली असते. त्यांना वयानुसारच खेळणी दिल्या गेली पाहिजे. मुलांना खेळणी दिल्यानंतर पालकांनी त्याचा वापर कोणत्या दृष्टीने व्हावा हे मुलांना समजून सांगितले पाहिजे. कोणत्याही खेळाची मागणी करताना मुलांच्या वयाचा विचार अवश्य करावा.
-नीलेश लोडाया, खेळण्यांचे व्यापारी