आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपले चिमुकले सुरक्षित आहेत काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी 2011 मध्ये नियमावली तयार केली. मात्र, या नियमावलीची शहरात अंमलबजावणी होत नसल्यामुळे दररोज हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. खासगी वाहनातून सर्रास विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा वेशीला टांगली असून, अवैध वाहतुकीला लगाम लावण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

दोन वर्षांपूर्वी अमरावती येथे विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करताना वाहनांचा अपघात झाला होता. त्यामुळे सरकारने महाराष्ट्र मोटार वाहन नियम स्कूल बसकरिता 2011 मध्ये वाहतूक नियमावली तयार केली. या नियमावलीचे आरटीओ, वाहतूक पोलिसांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित होते, मात्र ही नियमावली अजूनही कागदावरच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणालाही देणे-घेणे नसल्याची स्थिती आहे. दररोज हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रिक्षा, ओमनी कार, टाटा मॅजिक, व्हॅनमधून शाळेत जातात. विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या या वाहनांचा रंग पिवळा असणे गरजेचे आहे. मात्र, अशी वाहने शोधूनही दिसत नाहीत. विद्यार्थ्यांची सर्वाधिक वाहतूक खासगी वाहनातून होत आहे. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाईल त्या शाळेचे नाव संबंधित स्कूल बस किंवा वाहनावर लिहिणे, स्कूल बसच्या कडेला रॉड लावणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता बसमध्ये एक कर्मचारी ठेवणे, विद्यार्थ्यांची व बस कुठे थांबेल याची यादी तयार करणे, बसमध्ये अग्निसुरक्षा व इतर सुरक्षेचे उपाय करणे, मर्यादित विद्यार्थ्यांना वाहनात बसवणे असे नियम आहेत. वाहनाचा ठरावीक वेग असावा, वाहनात एयर फे्रशनर लावणे आदी नियम आहेत. नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
विद्यार्थ्यांना कोंबून बसवणे चुकीचे
एकमेकांच्या अंगाला घासून बसणे हेच मुळात चुकीचे आहे. आॅटोमध्ये लहान मुलांना कोंबून बसवल्यामुळे त्यांच्यामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होते. श्वास घेण्यासही त्यांना त्रास होतो. शाळेत जाण्यासाठी ते प्रफुल्लीत असणे आवश्यक असताना, त्यापूर्वी आॅटोमध्येच त्यांची मानसिक कोंडी होते. शारीरिकदृष्ट्या प्रत्येकाला प्रायव्हसी आवश्यक आहे. मात्र, गर्दीमुळे ती हिरावल्या जाते. महत्त्वाचे म्हणजे एकमेकांच्या अंगाला घासून बसणे हे चुकीचे आहे. त्याचा परिणाम त्याच्या मनावर कुठेतरी होत असतो. दुसरे म्हणजे मुलांमध्ये गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे वाहनचालकाचे लक्ष विचलित होऊन अपघातही होऊ शकतो. डॉ. प्रमोद ठाकरे, मानसोपचार तज्ज्ञ.
शहरातील 80 टक्के आॅटोंना जाळ्या लावल्या; कारवाईचे सत्र अद्याप सुरूच
विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या आॅटोंची तशी नोंद नाही. मात्र, शहरात 500 च्या वर आॅटोंमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होते. आम्ही आजपर्यंत 80 टक्क्यांपेक्षा जास्त आॅटोंना जाळ्या लावल्या आहेत. उर्वरित आॅटोंनाही लवकरच जाळ्या लागतील. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी दिसले तर त्यांच्यावर नियमित कारवाई केल्या जाते.’’
शिवा ठाकूर, वाहतूक पोलिस निरीक्षक.

काय म्हणतात पालक...
स्कूल बस परवडत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून पाठवत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तसेच स्कूल बसेस वेळेवर विद्यार्थ्यांना न्यायला आणि सोडायला येत नाहीत. खासगी वाहने लवकर येतात, तसेच त्याचे भाडेही कमी आहे.
हप्तेबाजीमुळे होत नाही कारवाई...
अवैध वाहतूक करणारे वाहनचालक वाहतूक पोलिसांना खूश करतात. दर महिन्याला वाहनचालक ठरावीक हिस्सा वाहतूक पोलिसांना देतात. 500 ते 700 रुपये महिन्याकाठी घेतले जातात, असे वाहनधारक सांगतात.
अनेक आॅटोंना बसवले कॅरिअर
इतर साहित्य ठेवण्यासाठी अनेक चालकांनी आॅटोरिक्षाच्यावर कॅरिअर बसवले आहे. असे करणे नियमबाह्य आहे. या कॅरीअरमधून दप्तर जर पडले तर ते उचलण्यासाठी विद्यार्थी आॅटोतून उतरून भररस्त्यात धावत सुटतात, अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते. याकडे पोलिसांचेही दुर्लक्ष दिसून येते.
आॅटोरिक्षा गॅसकिटवर
बहुतांश आॅटो, ओमणी व्हॅनला अवैध गॅसकीट लावून ‘एलपीजी’ वर ही वाहने धावतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, आरटीओ विभागाच्या वाहन तपासणी मोहीमेत अशा वाहनांवर कारवाई होताना दिसून येत नाही.