आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता कार्टून बंद; शालेय गृहपाठ होणार सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मागील दोन महिन्यांपासून शांत असलेल्या शाळा, विद्यालयांमधून 26 जूनपासून पुन्हा किलबिलाट सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाच्या स्वागतासाठी शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन समिती यांची तयारी पूर्ण झाली आहे. उन्हाळी सुट्यानंतर आपल्या शैक्षणिक सत्राला नव्याने प्रारंभ करताना पालक, विद्यार्थ्यांनी काही बाबींची खबरदारी घेणे मात्र जरुरीचे आहे.

शालेय शिक्षणाला आज पुढील करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले असून, चांगल्या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश व्हावा, पहिल्या दिवशी आनंदी वातावरणात त्याने शिक्षणाला सुरुवात करावी, त्यासाठी आवश्यक त्या शालेय साहित्याची पूर्ती करण्यासाठी प्रत्येकच पालक धडपडतो. मुलांमध्ये शाळेत जाताना उत्साह दिसून येतो. नव्याने शाळेत येणारी बच्चे कंपनी पहिल्या दिवशी काही प्रमाणात गोंधळ घालतात. शाळेचा परिसर, शिक्षक, आसपास भरपूर मुले आणि सोडून जाणारे आईवडील पाहून ते रडण्यास सुरुवात करतात. मात्र, हळूहळू ते रुळतात. तर मोठ्या वयातील विद्यार्थी उन्हाळी सुट्यानंतर आपल्या मित्रांना परत भेटणे, सुट्यांमध्ये काय मौज केली? कुठे कुठे पर्यटन केले? मामाच्या गावातील धम्माल सांगणे या उत्साहात वावरतात. मात्र, नव्याने शाळेत दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांसंदर्भात काही बाबींची विशेष काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे. त्यांचा दररोजचा टिफिन बॉक्स, गणवेश, खांद्यावर लादले जाणारे पुस्तकांचे ओझे, शारीरिक स्वच्छता, त्यांचे मन आनंदी ठेवणे आदींची काळजी पालक मंडळीने घेणे गरजेचे आहे.
शालेय साहित्यात यंदा वैविध्य असून, खास बच्चे कंपनीची पसंत असलेले छोटा भीम, अँग्री बडर््स, डोरेमॉन, बार्बी यांना अधिक पसंती आहे. कंपास, वॉटरबॅग, टिफिन बॅग, स्कूल बॅग, खोडरबर, पेन्सिल, कटर आदींमध्ये त्यांचीच छाप दिसून येते. खोडरबरमध्येही अनेकविध रंगांसह आकार उपलब्ध आहेत. छोटी बाहुली, कार्टून कॅरेक्टरसह भाजीपाल्याच्या आकारातील खोडरबर विक्रीस आहेत. तसेच कंपास, स्कूल बॅगमध्येही खूप वैविध्य दिसून येते. वॉटरबॅगमध्ये 24 तास पाणी थंडगार ठेवणार्‍या महागड्या बॉटल्स्ला अधिक पसंती आहे. तसेच स्कूल बॅगमध्ये वॉटरप्रूफला मागणी आहे.
‘स्कूल चले’साठी मुलांची उत्सुकता शिगेला
मुले आनंदी राहण्यासाठी हे करा....

४आईवडिलांपासून दुरावण्याची भीती म्हणून मुले रडतात. हळूहळू त्याला शाळेविषयी सांगायला सुरुवात करावी. शाळा फिरवून तेथे काही वेळ खेळू द्यावे. त्याला शाळेत जाऊन खेळायचे आहे, असे सांगा म्हणजे त्याच्यावर दबाव राहणार नाही. मुले खूपच रडत असल्यास पालकांनी काही वेळ शाळेबाहेर थांबावे. त्याला सवय झाल्यानंतर ते भय दूर होते.’’
डॉ. अनुप राठी, मानसोपचार तज्ज्ञ
ओझ्यासाठी घ्यावी खबरदारी...
४दप्तरांचे वजन दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे मुलांना मानेचे व पाठीचे दुखणे होते. काहींना खांदेदुखीचाही त्रास होतो. काहींना पुढे पाठ, कंबरदुखीचे दुखणे संभवते. या ओझ्यामुळे त्यांचे कुबडे निघते, उभे राहण्याची पद्धत बदलते. त्यावर खबरदारी म्हणून काही शाळांमधून बहुतांश साहित्य शाळेतच कपाट देऊन ठेवले जाते. मुलांना केवळ गृहपाठासाठी लागणार्‍या साहित्याची ने-आण करावी लागते. हा उत्तम पर्याय असून, शक्य झाल्यास प्रत्येक शाळेने तो अंमलात आणावा. तसेच पालकांनीही मुलांच्या दप्तरातील अनावश्यक ओझे कमी करण्यावर भर द्यावा तसेच विद्यार्थ्यांना हलकाफुलका व्यायाम, योग तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावा. तसेच शारीरिक शिक्षणाविषयी जागृती गरजेची आहे. गणवेश मोकळा असावा. पायातील सॉक्सही सैल असावेत. त्यामुळे विद्यार्थी रिलॅक्स राहील.’’
डॉ. संजय सोनवणे, आॅर्थोपेडिक सर्जन
असा असावा टिफिन
४बहुतांश मुले टिफिनमध्ये फास्टफूडच हवे, असा आग्रह धरतात अन् आईसुद्धा सकाळी पोळ्या टाकण्याचा कंटाळा करून नुडल्स्, बाजारातील चिवडा असे देतात, हे टाळले पाहिजे. सकाळी मुलांना एक कप दूध व त्यासोबत एक काजू, एक बदाम व एक खारीक द्यावे. त्यानंतर मल्टीग्रेन पराठे द्यावेत. जसे सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी या सर्वांचे एकत्र पीठ घेऊन पराठे करावेत. खोबरे, तीळ यासारखी चटणी द्यावी. सॉस देऊ नये तसेच डाळीचे पीठ, उडीद, मूग, बरबटी, हरभरा अशा प्रकारच्या डाळींच्या पिठापासूनही चविष्ट पराठे देता येतील. मोड आलेल्या धान्याचे पराठे एक पर्याय आहे. ज्या भाज्या मुलांना आवडत नाही, त्यांचेही चविष्ट पराठे करून डब्यात द्यावेत. ब्राऊन ब्रेड व आमलेट द्यावे. मिल्क किंवा सँडविच ब्रेड टाळावी. मशरुम, राजमा, पालेभाज्या यांचाही वापर करावा. घरी परतलेल्या विद्यार्थ्यांना एखादे फळ, ज्युस, चिक्की, गूळ व फुटाणे असे द्यावे. ते दिवसभर क्रियाशील राहतील.’’