आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाताळासाठी सजले शहरातील चर्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अगदी सहा इंचांपासून तर 5-6 फूट उंचीपर्यंतचे विविध प्रकारातील ‘ख्रिस्मस ट्री’ सगळ्यांचे खास आकर्षण ठरत आहे. नाताळसाठी बाजारात अनेक आकर्षक भेटवस्तू आलेल्या आहेत.
नाताळात ‘ख्रिस्मस ट्री’ला सर्वात जास्त महत्त्व असते. बाजारात अनेक उंचीचे ट्री दिसून येत असून, उंचीनुसार त्यांचे दर आहेत. स्प्रिंगपासून बनवलेले ‘ख्रिस्मस ट्री’ लक्ष वेधत आहे. विद्युत रोशणाई असलेले, अनेक रंगांतील सजवलेले ट्री उपलब्ध आहेत. हिरव्या रंगाप्रमाणेच लाल, पिवळा अशा विविध रंगांत हे ट्री उपलब्ध आहेत. 100 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत किंमतीचे ‘ख्रिस्मस ट्री’ भेट म्हणून द्यायला उपयुक्त आहे. लहान मुलांचे आवडते सांताक्लॉजचे सॉफ्ट टॉय लहान मुलांना आकर्षिक करत आहेत. 100 रुपयांपासून 700 रुपयांपर्यंत यांचे दर आहेत.
विविध उंचीच्या ‘ख्रिस्मस ट्री’चे आकर्षण
प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन तसेच नूतन वर्षानिमित्त 24 ते 31 डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, शहरातील सर्व चर्च सजले आहेत. कुठे कॅरल पार्टी तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रम, कॅम्प फायरचे आयोजन केले आहे. तीनही प्रमुख चर्चमध्ये आकर्षक सजावट केली असून, विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. तसेच नाताळसाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत.
नाताळसाठी सजले शहरातील चर्च
ख्रिश्चन कॉलनीतील बेथेल सेव्हीअर्स अलायन्स चर्चमध्ये ख्रिस्त जयंतीची तयारी जोरात सुरू असून, फादर एस. डी. डोंगरदिवे, सचिव सरला मेर्शामकर खजिनदार अरविंद बिरपॉल, अमित ठाकूर, आदींच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. यामध्ये आज 23 डिसेंबरला तरुण संघाने कॅरल पार्टीतून घरोघरी संदेश दिला. 24 डिसेंबरला ख्रिश्चन कॉलनीत कॅरल पार्टी होईल. 25 डिसेंबरला ख्रिस्त जयंतीची विशेष उपासना, लेकरांचे दान, विशेष दानाचा कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता होईल. 26 डिसेंबरला बच्चे कंपनीसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दुपारी 1.30 वा. केले आहे, तर 27 डिसेंबरला महिला व पुरुषांचे खेळ दुपारी 1 वा. होतील. तर सायंकाळी 7 वा. सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 28 डिसेंबरला संडे स्कूलचा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी 7 वा. होईल. 29 डिसेंबरला आनंद मेळ्याचा कार्यक्रम होईल. 31 डिसेंबरला वॉच नाईट उपासना, साक्ष, विशेष गीत व चहा-फराळाचा कार्यक्रम रात्री 9.30 वाजता होईल. 1 जानेवारीला सकाळी 9.30 वाजता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल.
गांधी मार्गावरील अलायन्स चर्चचे फादर रेव्हरेन्ट डी. एल. तेलगोटे असून, येथे 21 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 21 ते 23 डिसेंबरदरम्यान कॅरल पार्टीचे आयोजन झाले. 24 डिसेंबरला तरुण संघ चर्चची सजावट करणार आहे. 25 डिसेंबरला सकाळी 10 ला ख्रिस्त जयंतीची विशेष उपासना होईल. 27 डिसेंबरला खेळ व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल. 28 डिसेंबरला काटेपूर्णा अभयारण्यात सहलीचे आयोजन केले आहे. 29 डिसेंबरला सकाळी 10 ते 6 दरम्यान उपासना व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन फादर डी. एल. तेलगोटे, प्रितीबाला जाधव, अविता तायडे यांच्या मार्गदर्शनात चर्चमध्येच केले आहे, तर 30 डिसेंबरला सहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. 31 डिसेंबरला वॉचनाइट सर्व्हिस म्हणजे रात्रीची विशेष उपासना देवानंद साळवे यांच्या मार्गदर्शनात होईल.
शहरातील सर्वात प्राचीन 1878 मध्ये स्थापित ऑल सेन्ट्स चर्चमध्ये आजपासून विविध कार्यक्रमांना फादर अँन्थोनी परिच्छा यांच्या नेतृत्वात प्रारंभ झाला. आज कॅरल पार्टीतून प्रभू येशू ख्रिस्तांच्या आगमनाची वार्ता गीतांमधून घरोघरी देण्यात आली. 24 डिसेंबरला मध्यरात्री येशू जन्माची प्रार्थना करण्यात येणार आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमसला सर्वांसाठी प्रार्थना होईल. त्यानंतर दिवसभर चर्च सर्वांसाठी खुला राहील. तसेच प्रभू भोज, कॅरल सिंगिंग, सांस्कृतिक रजनीचा कार्यक्रम होणार आहे. प्रार्थनेस येणार्‍या प्रत्येकाला केकचे वितरण करण्यात येईल. 26 डिसेंबरला क्रीडा दिनाचे आयोजन केले असून, या वेळी विविध खेळ मुलांसाठी आयोजित करण्यात येतील. या खेळांमध्ये मलांचा सहभाग असतो. 31 डिसेंबरला गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याच दिवशी मध्यरात्री प्रार्थना व कॅम्प फायर, तसेच विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमासाठी सचिव मनोज फिलीप, कोषाध्यक्ष के. मथ्यू पुढाकार घेत आहेत.