आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सिटिझन पोलिसिंग’ला तड्याचा प्रयत्न; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अकोला- भरदिवसा घडणार्‍या घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू केलेल्या ‘सिटिझन पोलिसिंग’च्या उपक्रमाला तडा देण्याचा प्रयत्न आठ ऑगस्टला रात्री करण्यात आला. माधवनगर आणि गुरुकुल कॉलनी परिसरातील सहा कारची तोडफोड करण्यात आली. या उपक्रमामुळे घरफोडी आणि चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी ही तोडफोड केली असावी, अशी शक्यता पोलिस आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.

काय घडले आठ ऑगस्टच्या रात्री
माधवनगरातील सागर अपार्टमेंट, मोरेश्वर इस्टेट, गुरुकुल कॉलनीत उभ्या असलेल्या कारवर हल्ला केला या हल्ल्यात एमएच-31-सीएम-2198,एमएच-28-व्ही-6567, एचएच-30-एफ-2957, एचएच-20-बीवाय-7944, एमएच-व्ही-2134 या कारच्या काचांचे नुकसान झाले. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात भादंविचे कलम 427 (नुकसान करणे) अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.

पेट्रोल चोरीचा घाट फसल्याने..
कार तोडफोडच्या घटनेप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असली तरी पोलिस घटनेची चौकशी करत आहेत. कारमधून पेट्रोल चोरीचा प्रयत्न फसल्याने कदाचित कारची तोडफोड केली असावी, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

पथदिवे बंद : मलकापूर परिसरातील गुरुकुल कॉलनीतील पथदिवे बंद आहेत. सिटिझन पोलिसिंगच्या दरम्यान पोलिसांनी परिसरातील नागरिकांना घरासमोर रात्री लहान लाइट सुरू ठेवण्याची सूचना केली होती. मात्र, बहुतांश नागरिकांनी घरासमोर लाइट लावले नाहीत.

गोरक्षणरोडवर धुमाकूळ
गोरक्षण रोडवरील कारच्या तोडफोडची घटना ताजी असतानाच महावितरण कार्यालयाजवळ कार जाळल्याची घटना नऊ ऑगस्ट रोजी उजेडात आली. या घटनेची मौखिक तक्रार परिसरातील नागरिकांनी रामदासपेठ पोलिसांना दिली. पोलिस कार मालकाचा शोध घेत आहेत.

उपक्रम असा
सिटिझन पोलिसिंगचा उपक्रम गोरक्षणरोडवरील गुरुकुल कॉलनी, परिवार कॉलनी, आसरा कॉलनी, टेलिकॉम कॉलनी, निवारा कॉलनी, केशवनगर, माधवनगरात राबवण्यात येत आहे. यामध्ये 25 स्थानिक नागरिक सहभागी होत आहेत तसेच 15 पोलिस त्यांना सहकार्य करतात. या सर्व 40 जणांचे आठ गट तयार करण्यात आले.

अंमलबजावणी अशी
सिटिझन पोलिसिंगअंतर्गत तयार केलेले गट सकाळी 10 ते चार या दरम्यान परिसरात गस्त घालतात. हे गट परिसरातील कुलूप असलेल्या घरांची चौकशी करतात. घर मालकाचा संपर्क क्रमांक मिळवतात. घरातील मंडळी परत केव्हा येणार, याबाबत पोलिस विचारणा करतात. या सर्व संभाषणाची पोलिस नोंद करतात.

‘त्याच’ घरांवर ‘लक्ष’
खदान पोलिस ठाण्याअंतर्गत संपत्तीचे गुन्हे होत असलेल्या परिसरात गस्तीचे विशेष नियोजन केले जाते. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना बंद घरांची यादी दिली जाते. गस्तीवर असलेले हे पोलिस या घरांवर रात्री विशेष लक्ष ठेवतात. रात्री चार ते पाच वेळा या घरांच्या परिसरात गस्तही घालण्यात येते. याबाबतची नोंदही नोंद पुस्तिकेत केली जाते.

पथदिवे सुरू व्हावेत
रात्री घडणारे गुन्हे रोकण्यासाठी परिसरातील बंद असलेले पथदिवे लवकर सुरू होणे आवश्यक आहे. या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर लाईट लावावेत. पोलिसांची रात्रीची गस्त सुरूच आहे. ही गस्त आणखी परिणामकारक घालणे आवश्यक आहे.
-अतुल खडेकार, नागरिक, गुरुकुल कॉलनी.

खोडसाळपणातून कारची तोडफोड
खोडसाळपणातून कारची तोडफोड केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. गोरक्षणरोड आणि मलकापूर परिसरात राबवण्यात येत असलेल्या ‘सिटिझन पोलिसिंग’मुळे संपत्तीच्या चोरीचे गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारची तोडफोड करणार्‍याचा शोध घेऊ.
-शैलेश सपकाळ, ठाणेदार, खदान पोलिस ठाणे.