आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची शहरामध्ये आता बस दत्तक योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पैसा नाही म्हणून काहीच करता येत नाही असे म्हणून हातावर हात ठेवण्यापेक्षा शहरासाठी काही तरी करण्याची तळमळ असली तर संकटातून मार्ग काढत त्यावर मात करता येते. प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी ही बाब सिद्ध केली आहे. डबघाईस आलेल्या शहर बस वाहतूक सेवेतील बसेसच्या देखभाल दुरुस्तीकरिता बस दत्तक योजना दयानंद चिंचोलीकर यांच्या कल्पकतेतून पुढे आली आहे. या योजनेमुळे महापालिकेला कोणताही पैसा खर्च न करता बसची देखभाल, रंगरंगोटी करता येणार आहे.
डबघाईस आलेली शहर बस वाहतूक सेवा बंद होण्याच्या मार्गावर असताना पुढील व्यवस्था होईस्तोवर महापालिकेने स्वत:च चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेने 40 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. मात्र, बसेसची दयनीय अवस्था झाली आहे. बसेसचे रंग उडाले असून, खुच्र्यांमधील कुशनही गायब झाले आहेत. त्यामुळे भंगार गाड्या महापालिकेला रस्त्यावर धावाव्या लागताहेत. भाडे दिल्यानंतर कोणतीही सुविधा मिळत नसल्याने महापालिकेच्या बसेसमधून प्रवास का करावा?असा प्रश्न शहरातील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळेच बस वाहतुकीकडे गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांनी दुर्लक्ष केले होते.

बसेसची दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच कुशन यासाठी एका बसला किमान 75 हजार रुपये, खर्च अपेक्षित आहे. परंतु, महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता, तूर्तास एवढा पैसा खर्च करणे महापालिकेला शक्य नाही. परंतु, निधी नाही, बसेस दुरुस्त करता येणार नाही, असे म्हणून थांबतील ते दयानंद चिंचोलीकर कसे? दयानंद चिंचोलीकरांनी यासाठी नवा फंडा शोधला. या फंड्याला प्रतिसादही मिळाला. शहरातील विविध कंपन्या, बँक, व्यावसायिक यांच्याशी संपर्क साधून दयानंद चिंचोलीकर यांनी एक योजना आखली. एका कंपनीने एक अथवा त्यापेक्षा अधिक बस दत्तक घ्यावी, या बसेसवर स्वत:ची जाहिरात करून त्या मोबदल्यात बसेसची रंगरंगोटी, कुशन व्यवस्था आदींवर खर्च करावा, अशा प्रकारची ही योजना आहे.

प्रभारी आयुक्तांच्या प्रयत्नाला पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला असून, पाच बसेस एक वर्षासाठी दत्तक देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेरंग व मोडक्यातोडक्या दिसणार्‍या बसेस येत्या काही दिवसांत चकचकीत होऊन रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.

32 हजाराचा मिळाला महसूल
अकोला शहर बस वाहतूक संस्था ही सेवा चालवत असताना दिवसाकाठी 20 ते 25 हजार रुपये महसुल प्राप्त करत होती. परंतु, महापालिकेने बस सेवा ताब्यात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी महापालिकेला 32 हजार रुपयांचा महसूल मिळाला.
टप्प्याटप्प्याने सर्व बसेस दिल्या जातील
4प्रवाशांना बसमधून आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी कुशन व्यवस्था आवश्यक आहे. या योजनेमुळे प्रत्येक बसची रंगरंगोटी केली जाईल. तूर्तास या योजनेला यश मिळाले असून, पाच बसेसची व्यवस्था झाली आहे. येत्या काही दिवसांत विविध कंपन्यांशी संपर्क साधून टप्प्याटप्प्याने सर्व बसेस चकचकीत केल्या जातील. दयानंद चिंचोलीकर, प्रभारी आयुक्त, महापालिका, अकोला.