आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराचा पाणीपुरवठा शनिवारपासून सुरळीत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-शहराला पाणीपुरवठा केल्या जात असलेल्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रात एअर सर्किट ब्रेकर बसवण्याच्या कामामुळे 21 जानेवारीपासून सुरू झालेला पाण्याचा मेगा ब्लॉक 25 जानेवारीला संपुष्टात येण्याची शक्यता आहे. शनिवारपासून शहरातील पहिल्या झोनमध्ये पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता महापालिका जलप्रदाय विभागातील सूत्रांनी वर्तवली आहे. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे 65 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दोनपैकी एका एअर सर्किट ब्रेकर (एसीबी) व त्यांच्या वायर आणि कंट्रोल वायरिंगचे काम संपले. स्थापित करण्यात आलेल्या या ‘एसीबी’ची चाचणी यशस्वी झाली.

नव्याने लावलेल्या या ‘एसीबी’वर तीन पंप काम करणार असून, त्यांची 65 दशलक्ष घनलिटर पाणीपुरवठय़ाची क्षमता आहे. त्यामुळे 24 जानेवारीला दिवसभर दुसरी ‘एसीबी’ लावण्याचे काम पूर्ण झाल्यावर 25 जानेवारीपासून पाणीपुरवठा शक्य होईल. टाक्यांमध्ये पाणी भरल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल. तूर्त, महान येथील दुरुस्तीचे काम अद्यापही झाले नसल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दोन ‘एसीबी’ गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी जळाल्या होत्या. त्यामुळे येथे विद्युत रोहित्र ते पाणीपुरवठा करणार्‍या पंपांना थेट वीजपुरवठा करण्यात येत होता. हा प्रकार येथील कर्मचार्‍यांसाठी धोकादायक होता. ‘एसीबी’ नसल्याने सर्व पंप एकाचवेळी सुरू करणेही शक्य नव्हते. ‘एसीबी’ लावल्यामुळे सर्व पंप एकावेळी सुरू करता येतील. या माध्यमातून शहरात चार दिवसाआड पाचव्या दिवशी होणारा पाणीपुरवठा आता कमी दिवसांच्या फरकाने शक्य होणार आहे. त्यासाठी काही कालावधी लागेल. एसीबी, इतर पंप, पाइपलाइन, पाणी टाक्यांची क्षमता, अखंडित वीजपुरवठा या सर्व गोष्टींवर पाणीपुरवठय़ाच्या कालावधीवर घट अवलंबून आहे. पुढील काळात महापालिका प्रशासन शहराला पाणीपुरवठा करण्याचा कालावधी घटवण्यासाठी प्रयत्नरत राहणार असून, त्या दृष्टीने तत्काळ परिणाम दिसणार नाही.

दरम्यान, पाण्याच्या मेगा ब्लॉकनंतर जलशुद्धीकरणा केंद्रातील दोनपैकी एक एसीबीचे पूर्ण काम होणे हे शहरातील नागरिकांसाठी दिलासा देणारी बाब ठरणार आहे.