आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मा'साठी आली, बसला मामाचा मार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आईवडिलांचा घटस्फोट झालेला. आईवडिलांचे प्रेम नाही. 14-15वर्षांची मुलगी आपल्या वडिलांच्या आईजवळ पारस येथे राहते. आईची भेट तर नाहीच. पण, आईच्या आईची आठवण तिला आली. ती पारसहून उमरी येथे आईची भेट होईल या भाबड्या आशेने आजीला भेटण्यासाठी शनिवारी मामाकडे आली होती. मात्र, संसाराला उबगलेल्या मामाने तिला बेदम मारले. रडत रडत तिने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे गाठले आणि कैफियत मांडली. त्यानंतर पोलिसांनी मामावर कारवाई तर केली खरी. पण, जेव्हा मुलगी तक्रार देऊन परत जायला लागली, तेव्हा तेथील सहायक पोलिस निरीक्षक आनंद मगर यांचे मन स्रवले. त्यांनी त्या मुलीला परत बोलावत तिच्या हाती 100 रुपयांची नोट ठेवत ‘बेटा आजीकडे जा,’ असे म्हणून पोलिसातील माणुसकी दाखवली.
उमरी येथे आजोळ असलेल्या मुलीची करुण कहाणी ऐकून पोलिस ठाण्यातील अनेकांच्या हृदयाला पाझर फुटला. या दुर्देवी मुलीचे गाव पारस. काही वर्षांपूर्वी तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर दोघांचेही लग्न झाले. आईचे लग्न झाल्यामुळे आईच्या मायेपासून ही मुलगी पारखी झाली. वडिलांनीसुद्धा दुसरे लग्न केल्यामुळे तेसुद्धा त्यांच्या पत्नीसोबत गाव सोडून परगावी गेले. मुलीचा सांभाळ तिची आजी (वडिलांची आई ) करते. आजीकडे राहताना त्या मुलीला भास झाला की, आपली आई दिवाळी असल्यामुळे आजीकडे आली असेल, म्हणून ती आईच्या भेटीच्या शोधात आणि आजीला भेटण्याच्या ओढीने पारसहून उमरी येथे आली. पण, आई दिसली नाही. तिच्या आजीसोबत मामाच्या घरी ती रात्रभर राहिली. मात्र, मामाचासुद्धा दोन वेळा घटस्फोट झाल्यामुळे तोही संसाराला उबगला असल्यामुळे तुझे आता आमच्याकडे काय काम म्हणून, तिला बेदम मारहाण केली, मुलीने मामाच्या भीतीमुळे सिव्हिल लाइन पोिलस ठाणे गाठले. पाठोपाठ मामाही आला. येथे कर्तव्यावर असलेले सहायक पोिलस निरीक्षक आनंद मगर यांनी त्या मुलीची विचारपूस केली. त्यांनी मामाच्या िवरोधात तक्रार दाखल करून घेतली आणि मुलीला तिच्या आजीकडे पारसला जाण्याचा सल्ला दिला. त्यासोबतच स्वत:च्या खिशातून मुलीला मदतही केली.