आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘होय, आता एका हाताने वाजू शकते टाळी!’; अकोल्याच्या अमोल अनासनेने केला विश्वविक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘टाळी एका हाताने वाजत नाही’ ही म्हण खोटी ठरवत अकोल्याच्या अमोल अनासने याने एका तासात एका हाताने तब्बल 7 हजार टाळ्या वाजवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये झाली आहे, अशी माहिती नगरसेविका मंजूषा शेळके यांनी दिली.

जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात 28 जूनला आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मंजूषा शेळके पुढे म्हणाल्या की, अमोल माझ्या प्रभागातील रहिवासी असून, सर्वसाधारण परिस्थितीवर मात करत छंद जोपासत आहे. त्याला दहावीपासून एका हाताने टाळी वाजवण्याचा छंद जडला. हाताच्या बोटांना रबरसारखे तळ हातावर आपटून त्यामधून टाळी वाजवण्यासारखा आवाज झाला. सराव व परिश्रमाने ही कला त्याने अधिक वृद्धिंगत केली. तो उजव्या व डाव्या हाताने ही टाळी वाजवण्याची क्रिया करतो. अमोलची ही कला इंडिया वर्ल्ड रेकॉर्डच्या निदर्शनास आली. येथील स्टुडिओमध्ये त्याच्या कलेचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ इंडिया वर्ल्ड रेकॉर्डला पाठवण्यात आला होता. त्यांनी एका हाताने टाळी वाजवणारा विक्रमवीर म्हणून त्याला घोषित केले. प्रा. महेश डाबरे म्हणाले की, अमोल माझा आज्ञाकारी विद्यार्थी असून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमधून तो घडला आहे. त्याच्या विक्रमाने अकोल्याच्या मानात भर पडली आहे. या वेळी अमोलचे वडील कैलास अनासने उपस्थित होते.

गिनीज बुकमध्ये नाव नोंदवायचे :
अमोलचा हा विक्रम गुगल साइटवर अमोल अनासने सर्च केल्यावर पाहता येतो. आपल्या विक्रमाविषयी बोलताना अमोल म्हणाला की, भविष्यात मला माझाच विक्रम मोडीत काढायचा असून, गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवायचे आहे. दरम्यान, अमोल डोनाल्ड डकची मीमिक्रीही करतो.