आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश पत्रक विक्रीच्या नियमांना तिलांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - इयत्ता दहावीचा निकाल लागला असून, गुणपत्रिका १५ जून रोजी मिळणार आहेत. त्याआधीच शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशपत्र विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशपत्राची िकंमत १० रुपये ठेवण्याचे निर्देश माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाने दिलेले असताना या वर्षीही शहरातील काही शिक्षण संस्था २० ते ५० रुपयांपर्यंत प्रवेश अर्जांची विक्री करत विद्यार्थ्यांची लूट करत आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणार्‍या संस्थांना पायबंद लावण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात मंडळाने ठोस उपाययोजना करत विद्यार्थ्यांची लूट करणार्‍या संस्थाचालकांविरुद्ध कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
अकरावीच्या सर्व शाखांची प्रवेशप्रक्रिया १५ जूनपासून सुरू होणार आहे. १५ जून ते १८ जूनपर्यंत प्रवेश अर्ज विक्री, स्वीकृतीचा कालावधी आहे. तसेच २२ जून रोजी अर्जांची छाननी करून संवर्गनिहाय प्राप्त अर्जानुसार यादी जाहीर करावी लागणार आहे. याच दिवशी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यानंतर २४ जूनपर्यंत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, २६ जून रोजी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही शिल्लक राहिलेल्या जागा प्राप्त प्रवेश अर्जातून गुणवत्तेनुसार भरणे, २९ जून रोजी प्राप्त झालेल्या अर्जांची यादी, दिलेल्या प्रवेशाची माहिती शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना सादर करणे,४ जुलैपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे.

शिक्षणसंस्थांवर वचक असावा
शैक्षणिक संस्था मनमानी शुल्क आकारत असते. आपल्या पाल्याला या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी पालक धडपडत असतात. याचा संस्थाचालक फायदा घेत असून, पालकवर्गाला प्रवेशप्रक्रियेदरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शिक्षण विभागाने या बाबीकडे लक्ष घालून संस्थांवर अंकुश ठेवत पालकांना दिलासा देण्याची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दैनिक दिव्य मराठीकडे व्यक्त केल्या आहेत.