आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दखल : सभागृहाच्या गॅलरीवरील काढल्या दारूच्या बाटल्या ; महापौर, उपमहापौरांचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नागरिकांच्या हितासाठी कायद्यावर चर्चा घडवून धोरणात्मक निर्णय घेणा-या महापालिका सभागृहाच्या गॅलरीवर मनपातीलच तळीरामांनी ठेवलेल्या दारूच्या बाटल्या महापौर, उपमहापौरांनी पुढाकार घेतल्यानंतर 2 जुलैला काढण्यात आल्या. महापालिकेतच चिंग होऊन मद्याच्या बाटल्या गॅलरीवर टाकण्याचे काम सर्रासपणे सुरू होते. ‘दिव्य मराठी’ने 2 जुलैच्या अंकात ‘महापालिका की मयखाना?’ असे वृत्त प्रकाशित करून या गंभीर प्रकाराकडे प्रशासन व पदाधिका-यांचे लक्ष वेधले होते.

महापालिकेत कार्यरत कर्मचा-यांपैकी अनेक कर्मचारी तळीराम आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक जण कर्तव्यावर असतानाही तळीरामाच्या भूमिकेतच असतात. या प्रकारावर प्रशासनाला अद्यापही अंकुश घालता आलेला नाही. त्यामुळेच महापालिका कार्यालय परिसराचा महापालिकेतील कर्मचा-यांनी मयखाना म्हणून वापर करणे सुरू केले आहे. मद्य प्राशन केल्यानंतर रिकाम्या बाटल्या कुणालाही दिसू नयेत यासाठीच त्यांनी या इमारतीच्या गॅलरीचा उपयोग बाटल्या ठेवण्यासाठी केला. इमारतीसमोर उभे राहिल्यानंतर अथवा इमारतीच्या छतावर चढल्यानंतरही या बाटल्या दिसत नाहीत. त्यामुळे हा प्रकार सर्रासपणे सुरू होता. परंतु, मालमत्ता कर विभागातील खिडकीतून या इमारतीच्या गॅलरीवर नेमके काय ठेवले आहे, ही बाब दृष्टिक्षेपात येते.

‘दिव्य मराठी’ने छायाचित्रासह हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर एकच खळबळ उडाली, तर नागरिकांमध्येही या विषयाची खमंग चर्चा झाली. या गंभीर वृत्ताची दखल घेत, महापौर ज्योत्स्ना गवई, उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी सकाळी स्वच्छता अधिकारी सुरेश पुंड यांना या लांच्छनास्पद प्रकाराची साफसफाई करण्याचे आदेश दिले तसेच सुरक्षा रक्षकांनाही या प्रकाराबाबत धारेवर धरले.