आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएम अकोल्यात आले, नाथाभाऊंना सोडून गेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बीडच्या कार्यक्रमाहून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ खडसे एकाच हेलिकॉप्टरमधून अकोला विमानतळापर्यंत आले. खडसेंना विमानतळावर सोडून मुख्यमंत्री लगेचच कार्यकर्त्यांचे हार-तुरे स्वीकारता निघून गेले. आश्चर्याची बाब म्हणजे, खडसे हे बुलडाणा जाण्यासाठी निघाले असता, त्यांनी काँग्रेसचे नेते माजी आमदार गव्हाणकर यांना बाळापूरपर्यंत लिफ्ट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

बीड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत भगवानगडावरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी राज्यातील अनेक मंत्री गेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरला जायचे होते, तर एकनाथ खडसे यांना बुधवारी बुलडाणा येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी जायचे होते. मात्र, दोेघांचेही मार्ग वेगवेगळे असताना दोघेही ज्येष्ठ नेत्यांनी एकाच हेलिकॉप्टरमधून येण्याचे ठरवले. राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीपासून खडसे फडणवीस यांच्यात फारसे जमत नसल्याच्या वावड्या उठत होत्या. मात्र, त्याला दोघांनी सोबत येण्यामुळे तडा गेल्याचे दिसून येते. या दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अकोला विमानतळावर मंगळवारी दुपारी वाजता पोहोचले होते. त्यानंतर ते नागपूरला रवाना झाले. या वेळी विमानतळावर खडसे येणार म्हणून भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे आणि अपक्ष नगरसेवक गोपी ठाकरे उपस्थित होते. या वेळी खडसे यांची भेट सिंधी समाजाच्या नेत्यांनी घेतली आणि त्यांना निवेदन दिले.

नाथाभाऊंशी पक्षापलीकडचे नाते
-नाथाभाऊंसोबत माझे पक्षाच्या पलीकडचे संबंध आहेत. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. मी पक्ष सोडला तेव्हापासून असा कोणताच क्षण नाही, आमची भेट झाली नाही. आमचे प्रेमसंबंध आहेत. म्हणून मी भेटलो. नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, काँग्रेस नेते

खडसे म्हणाले, "या नारायणराव, चला माझ्यासोबत'
पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि बाळापूर मतदारसंघाचे आमदार राहिलेले नारायणराव गव्हाणकर हे एकनाथ खडसे येणार म्हणून विमानतळावर त्यांना भेटण्यासाठी गेले होते. एकीकडे भाजपचे नेते बसल्यामुळे बाजूच्या बाकड्यावर गव्हाणकर खडसेंची वाट पाहत बसले होते. खडसे हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या वेळी खडसेंची नजर गव्हाणकर यांच्याकडे गेल्यावर ते म्हणाले,"या नारायणराव, चला' असे म्हटल्यावर दोघेही एकाच कारमधून बाळापूरपर्यंत सोबत गेले होते. गव्हाणकर यांना सोबत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या चर्चेमुळे गव्हाणकर स्वगृही तर परतणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.