आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्त: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर पेंढय़ा फेकल्या, गाडीत बसून ऐकल्या व्यथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणार (जि. बुलडाणा)- गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यावर खराब झालेल्या हरभर्‍याच्या पेंढय़ा फेकून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. ‘केवळ पाहणी करून आश्वासने देण्यापेक्षा ठोस मदत करा,’ अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. काही शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवून रोष व्यक्त केला. या प्रकाराने गोंधळून गेलेल्या चव्हाण यांनी गाडीत बसूनच निवेदने स्वीकारून काढता पाय घेतला.

गेल्या आठवड्यात विदर्भात गारपिटीने पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी मराठवाड्यातील गारपीटग्रस्तांचा दौरा आटोपून मुख्यमंत्री बुधवारी बुलडाणा जिल्हय़ात आले होते. दुपारी 12 वाजता हेलिकॉप्टरद्वारे आलेल्या चव्हाण यांनी लोणार शहराजवळ असलेल्या शारा येथे धावती भेट दिली. अरविंद डव्हळे या शेतकर्‍याच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली तसेच जमलेल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांशी काही वेळ चर्चेचा सोपस्कारही उरकला. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते. या वेळी शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडून तातडीने मदत देण्याची मागणी केली.

8 मार्च रोजी झालेल्या गारपिटीमुळे वाशीम-बुलडाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या पहूर गाव अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहे. मात्र हे गाव काहीसे दुर्गम भागात असल्याने तिकडे न जाता शहरापासून जवळच असलेल्या गावात जाऊन मुख्यमंत्र्यांनी दौर्‍याची औपचारिकता पूर्ण केली. शारा येथे केवळ 15 मिनिटे थांबून त्यांनी थेट हेलिपॅड गाठले.

गाडीत बसून ऐकल्या व्यथा
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांच्या गाड्यांवर गारपिटीमुळे खराब झालेल्या हरभर्‍याच्या पेंढय़ा फेकल्या. काही शेतकर्‍यांनी चव्हाण यांची गाडी अडवून सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. मुख्यमंत्र्यांनी गाडीत बसूनच निवेदने स्वीकारली व मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन काढता पाय घेतला. त्यामुळे शेतकर्‍यांचा हिरमोड झाला.

मंत्रिमंडळ बैठकीत घेणार आज मदतीचा निर्णय
मुंबई गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी गारपीटग्रस्तांना दिले आहे. त्यामुळे या बैठकीत होणार्‍या निर्णयाकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मदतीचा आड येणार नसल्याचा पुनरुच्चारही चव्हाण यांनी या दौर्‍यात केला.

पीक कर्ज माफ करा
यवतमाळ जिल्हय़ातील बोरी अरब गावातील नुकसानीची चव्हाण यांनी पाहणी केली. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालत पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली.

पीक विम्यातील दोष दूर करणार : मुख्यमंत्री
रिसोड- ‘पीक विमा योजनेत काही दोष आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून हे दोष दूर करण्यावर आपण भर देणार आहोत,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिली. वाशीम जिल्ह्यातील वाडीवाकद गावातील नुकसानग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी अभूतपूर्व गारपीट झाली. एकाच वेळी चक्रीवादळ, पाऊस आणि गारांचा मारा, असे तिहेरी संकट कोसळले.

28 जिल्ह्यांत प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहेच. राज्य सरकार वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाला नुकसानीचा अहवाल पाठवत असून केंद्राकडून मदत देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, केंद्रीय पाहणी पथक गुरूवारी पूर्व विदर्भात दाखल होत असून ते पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतील.