अकोला बुधवारी सकाळी ९.४५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवणी विमानतळावर पोहोचतील.त्यानंतर हेलिकॉप्टरने कारंजाला जातील. त्यानंतर १.४० वाजता तेल्हारा येथील गौतमा नदीकडे प्रयाण करतील. दुपारी १.५० वाजता गौतमा नदी येथे आगमन नदी पुनर्जीवन कामाची पाहणी करतील. दुपारी २.३० वाजता माळेगाव बाजार येथे नाला रुंदीकरण खोलीकरण कामाची पाहणी करतील.
३.३५ वाजता घुसर येथे शेततळ्यांच्या कामाची पाहणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेतील. वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतील. ६.०५ वाजता विश्रामगृह येथे राखीव वेळ राहील. ६.२० वाजता खुले नाट्यगृह येथे आदर्श गोसेवा संस्थेच्या अभिनंदन सोहळ्यास उपस्थित राहतील.
कधीकाळी वैभवशाली असलेल्या अकोल्याची अवस्था सध्या बकाल झाली आहे. साध्या मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न सुटू शकलेला नाही, विकासाच्या बाबतीत फक्त उदासीनता आहे.
इच्छाशक्तीच्या अभावाने अकोल्याचा विकास रोखला आहे. राजकीय महत्त्वकांक्षा आणि स्वार्थी राजकारणामुळे चांगले निर्णय होऊ दिले जात नाहीत. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर होता तोही विकास रखडत गेला. अधिकाऱ्यांच्या वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या जागा, कंत्राटी आणि मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर शहराचा गाडा कसातरी हाकला जात आहे. भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना, अर्धेअधिक बोगस नळ कनेक्शन, अवैध फ्लॅट स्कीमचा विळखा. सामाजिक न्याय भवन असो किंवा सांस्कृतिक सभागृहाच्या उभारणीचा प्रश्न. स्वच्छता, रस्ते, पाणी, महामार्गाचे रखडलेले रुंदीकरण, विमानतळाच्या विस्तारीकरण, अशी ही प्रश्नांची संपणारी जंत्रीच आहे. दोष कोणाचा हा मोठा विचारमंथन करायला लावणारा प्रश्न आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे. महापालिकेकडे विकासासाठी मोठा निधी आहे. पण, कामे होत नाहीत ही शोकांतिका आहे. श्रेयवादाच्या लढाईत पुढाकार घेणाऱ्या आणि गटातटाच्या राजकारणात सर्वसामांन्यांना भरडवणाऱ्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी मोट बांधावी, हीच अपेक्षा.
विकासासाठी आधी नेत्यांची मोट बांधा
समस्यांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या अकोलेकरांना महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराचा कायापालट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या १५ वर्षांच्या कालावधीत महापालिकेने नागरिकांकडून कररूपी भोपळ्याच्या मोबदल्यात मूलभूत सोयीसुविधांचा आवळा दिला. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी कधी २०० कोटी निधी देण्याची तर कधी शहराला दत्तक घेण्याची घोषणा केली. मात्र, या घोषणाही हवेतच विरल्या. वैदर्भीय असलेल्या नव्या मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे अकाेलेकरांना आता ‘अच्छे दिन’ दाखवण्याच्या दृष्टीकोणातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शहर जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.
केंद्रात, राज्यात महापालिकेत भाजपची सत्ता असताना शहर विकासापासून काेसाे दूर आहे. अधिकाऱ्यांची कमतरता, उत्पन्न वाढवण्याची थांबलेली प्रक्रिया, त्यातून थांबलेली विकासकामे, यामुळे सर्वसामान्य अकोलेकर समस्येच्या गर्तेत फसला आहे. आता गल्ली ते दिल्ली एकाच पक्षाचे सरकार असल्याने या संधीचे सोने करून मुख्यमंत्री यात लक्ष घालून शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे. अकोल्याच्या महापालिकेला मुख्यमंत्र्यांनी खरंच दत्तक घेण्याची वेळ आली आहे.
उपलब्ध पैशांचा नियोजनबद्ध विनियोग झाला तरी विकासाच्या एका नव्या पर्वाला प्रारंभ होईल. त्यामुळे भकास होत चाललेल्या अकोल्याला नवी ओळख मिळेल. अकोला हे सर्वात महत्त्वाचे व्यापारी शहर मानण्यात येते. त्या दृष्टिकोनातून औद्योगिक वसाहतीच्या समस्याही मार्गी लागणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठीही प्रयत्न हवे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, महामार्गही रखडला...महापालिकेत अधिकाऱ्यांची रिक्त पदे...