आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय फलक कायम?, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हा परिषद आणि सात पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांचे फलक अद्यापही लागलेले आहेत. ते फलक काढण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना गेल्या काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही राजकीय पक्षांचे फलक अद्यापही कायम आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन झाले असून, याकडे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता बुधवार, 6 नोव्हेंबरला लागू झाली होती. राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेबाबत निर्देश मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिल्या आहेत. यासोबतच जिल्हा प्रशासनाला निवडणूक काळात काही गैरप्रकार झाल्यास याबाबत तत्काळ राज्य निवडणूक विभागाला माहिती द्यावी लागणार आहे. याची दक्षता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाला घ्यावी लागणार आहे. मात्र, जिल्ह्यात काही राजकीय पक्षांचे लागलेले फलक अद्याप काढलेले नाहीत. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे. याबाबत मंडळ अधिकारी व तलाठय़ांची बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे व संघटनांचे फलक काढावे, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यांच्या निर्देशाचे पालन करत अकोला तहसीलदार राजेंद्र हांडे यांनी जिल्हा परिषदेतील राजकीय पक्षाचे फलक 7 नोव्हेंबरला काढले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या शासकीस निवासस्थानातील फलकसुद्धा हटवले होते.

गंभीर बाब
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेची काळजी घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील राजकीय पक्षाचे फलक काढण्याचे निर्देश संबंधिताना देण्यात आले आहे. फलक कायम असतील तर ही गंभीर बाब आहे.’’ अरुण शिंदे, जिल्हाधिकारी.

नोटीस देण्याच्या सूचना
निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे व शुभेच्छांचे फलक लागलेलेच आहेत. यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे हे फलक काढावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने देण्यात आले आहे. ज्यांनी तत्काळ फलक काढले नाही, त्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिले आहे.

फलक काळजीपूर्वक झाकले नाहीत
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागून दहा ते बारा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे फलक काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच फलक काढण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, हे फलक काढण्याऐवजी ते कापडाच्या माध्यमातून झाकण्यात आले. ते फलक काळजीपूर्वक झाकलेच गेले नाही. काही राजकीय पक्षांचे फलक आजही दिसून येतात. त्यामुळे हे फलक काढण्याची मागणी होत आहे.