आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक - जिल्ह्यात हिवतापाचे वाढले प्रमाण, आठवडाभरातच पाच रुग्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गत दर आठवड्याला जिल्ह्यातील 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील गावातील नागरिकांचे रक्त नमुने घेतले जात आहेत. या नमुन्यातून हिवतापाचे प्रमाण आढळल्यास त्यांच्यावर उपचार करून हिवतापाला प्रतिबंध घातला जातो. 1 ते 7 ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 10 हजार 642 रक्त नमुने गोळा करण्यात आले असून, या सात दिवसांत पाच हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत, तर मागील चार महिन्यांत 59 रुग्ण आढळून आले आहेत.

आजही जिल्ह्यातील काही भागांत प्राथमिक आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध होत नाही. परिणामी, पावसाळ्याच्या दिवसात अशा गावात हिवताप, मलेरियासारख्या आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळतात. तर आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने या रोगावर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी पावसाळ्याच्या दिवसात विशेष तयारी केली जाते. त्या अनुषंगाने आर.डी.के. (रॅपिड डायग्नोस्टिक किट) ह्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी वाटप करण्यात आल्या आहेत व या किटद्वारे गावागावांत ‘आशा’ हिवतापाची तपासणी करत आहेत.

तर या किटद्वारे हिवताप तपासणी कशी करावी, याबाबत आशांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावांत हिवताप तपासणीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यानंतरदेखील हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य विभागासमोर नवे संकट निर्माण झाले आहे. आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व तयारी केली असली, तरी हा आजारा आटोक्यात येईपर्यंत प्रशासनाची डोकेदुखी थांबणे शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळय़ाच्या दिवसामध्ये नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने सर्वस्तरावर योग्य ती उपाययोजना करण्यात येते. मात्र त्यानंतरही काही आजार जडतातच. जिल्ह्यातील काही भागात योग्य वेळी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्यानेही साथीचे आजार पसरण्यास मदत मिळते. यासंदर्भात परेशी व्यवस्था करण्याची गरज आहे.
असे आढळले रुग्ण
आरोग्य विभागांतर्गत एप्रिल ते जुलै 2014 दरम्यान 1 लाख 44 हजार 923 रक्त नमुने घेण्यात आले आहेत. या रक्त नमुन्यातून जिल्ह्यात एकूण 54 हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत, तर जुलै महिन्यात 48 हजार 725 रक्त नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी जुलै महिन्यात 12 हिवतापाचे रुग्ण तर ऑगस्ट महिन्यात 5 रुग्णांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांवर औषधोपचार करून त्यांना बरे केले असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाने दिली. 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तगत येणार्‍या 1300 गावांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाचे रक्त नमुने घेतले जात असून, संबंधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
हिवतापाचे प्लाझमोडियम व्हॅयव्हॅक्स आणि प्लाझमोडियम फॅक्सीपेरम हे दोन प्रकार आहेत. यामध्ये प्लाझमोडियम व्हॅयव्हॅक्स झाल्यास रुग्णाला त्रास होतो, परंतु रुग्णाचा मृत्यू होत नाही. तर दुसरा प्रकार म्हणजे प्लाझमोडियम फॅक्सीपेरम झाल्यास रुग्ण दगावतो. परंतु, जिल्ह्यात प्लाझमोडियम फॅक्सीपेरम हिवताप झालेल्या रुग्णांचा 1980 पासून मृत्यू झालेला नाही. मात्र, एप्रिल ते जुलै महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यापैकी 54 हिवतापांच्या रुग्णांमध्ये तीन रुग्ण हे प्लाझमोडियम फॅक्सीपेरमचे आढळले आहेत, हे विशेष.

हिवतापाच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.