आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान घसरले; आता गुलाबी थंडीला झाली सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरमध्ये तापमान काही अंशाने घसरले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तापमानात घसरण आणि थंडीत वाढ होत आहे. थंडीवर मात करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात गरम कपड्यांची दुकाने थाटली असून, ग्राहकांचा कल गरम कपडे खरेदी करण्याकडे वाढत आहे.

ऋतुमानानुसार ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे चार महिने हिवाळय़ाचे म्हणून ओळखले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस होतो. त्यामुळे थंडीचे दिवसही पुढे ढकलले जातात. ऑक्टोबरमध्ये तापमान 20 अंशावर राहत असल्यामुळे थंडी जाणवत नाही. मात्र, नोव्हेंबरमध्ये दिवसागणिक थंडीमध्ये वाढ होत असते. या महिन्यात 17 अंशापर्यंत तापमान असल्याने थंडीचा जोर वाढत आहे. यंदा पाऊस अधिक झाल्याने थंडीही जोर पकडणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पहाटे 5 ते सकाळी 7 धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहत असल्याने सकाळी थंडी, दुपारी ऊन पडत असल्यामुळे तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवतो, तर सायंकाळी आणि रात्री पुन्हा गारव्यात वाढ होत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. यामध्ये उत्तरोत्तर वाढ होऊन थंडीचा कडाकाही वाढत आहे. उत्तर गोलार्धात बर्फवृष्टी होत असून, तेथे रक्त गोठवणार्‍या थंडीला सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबरला किमान तापमान 17 अशांवर होते. गेल्या वर्षी हेच तापमान 15.4 अशांवर होते. त्यामुळे यंदा पावसाचे दिवस लांबल्याने थंडीही उशिरा सुरू झाली.

त्वचा रोगातही वाढ
हिवाळ्यात मानवाला त्वचा कोरडी होणे, ओठ फाटणे यासह त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये प्रत्येकाने अंगभर कपडे घालणे आवश्यक आहे. तसेच विविध क्रिम, लोशन लावण्याची गरज आहे. डॉ. भारत पटोकार, चर्मरोग तज्ज्ञ.

यंदा गरम कपड्यांची विक्री कमी
कमी थंडीमुळे धंद्यावर परिणाम झाला आहे. सर्व स्वेटर विकल्या जातात की नाही, अशी भीती आहे. 400 रुपये ते 1600 रुपयांपर्यंत स्वेटरचे भाव आहेत. शंकर, स्वेटर विक्रेता.

हवामान कारणीभूत
उत्तरेकडच्या हवामानावर विशेषत: आपल्याकडील थंडी अवलंबून असते. तेथे जास्त थंडी असेल तर तेवढय़ा कालावधीत आपल्याकडे थंडी राहते. प्रा. संजय वंजारी, हवामान तज्ज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.