आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE - अधिकार्‍याचा हेतू अन् लुटीचा सेतू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नागरिकांना कमी पैशात विविध प्रकारच्या जलद सेवा देण्यासाठी शासनाने सेतू उपक्रम सुरू केला. मात्र, सेतू केंद्राकडूनच नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचे वास्तव मंगळवारी पाहावयास मिळाले. सेतू केंद्रावर लक्ष ठेवणारे अधिकारीही या लुटीकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत आहेत.
सेतू उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध विभागांतर्गत नागरिकांना ई-प्रशासकीय सेवांचा लाभ दिल्या जातो. नाममात्र शुल्क आकारून या सेवा नागरिकांना दिल्या जातात. यासाठी सर्व सेतू केंद्रांना ठरावीक दर निश्चित करून देण्यात आले आहे. मात्र, ठरावीक रकमेव्यतिरिक्त जादा रक्कम बर्‍याच सेतू केंद्रांवरून घेतली जात आहे. या सर्व सेतू केंद्रांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहे. नायब तहसीलदार दर्जाचा अधिकार्‍याकडे प्रमाणीकरणाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना मदत म्हणून वेळप्रसंगी इतर नायब तहसीलदार स्वाक्षरीचे काम करीत असतात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ असलेले सेतू केंद्र बंद करून सीएमएस नावाच्या कंपनीला शासनाने कंत्राट दिलेला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत महा ई-सेवा अंतर्गत सेतू केंद्र सुरू झाली आहेत, अशी अकोला शहरात 15 सेतू केंद्र आहेत. या सेतू केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकार्‍याची नेमणूक केली असतानाही केवळ अर्थकारणापोटी सेतू केंद्राच्या मनमानीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची वास्तविकता आहे.

30 रुपयांनी होतेय लूट
शासनाने प्रमाणपत्राचे दर ठरवून दिल्यानंतरही जादा पैसे सेतू केंद्राकडून घेतले जात आहे. साधारणपणे 20 ते 30 रुपयांनी सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे.

कुणीही प्रतिज्ञालेख घेऊन जा
ओळखपत्र असल्याशिवाय प्रतिज्ञालेख देण्यात येऊ नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहे, तरीसुद्धा जादा पैसे घेऊन काही सेतू केंद्र संचालक प्रतिज्ञालेख बनवून देत आहेत. यामुळे कुणीही कुणाच्या नावाचा प्रतिज्ञालेख बनवू शकतो.
आवश्यक कागदपत्रे
नॉन क्रिमिलेअर : आॅनलाइन अर्ज, प्रतिज्ञालेख, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), जातीचे प्रमाणपत्र, वडिलांची टीसी, वडील शासकीय सेवेत असतील तर फार्म नंबर 16 , पगार पत्रकाची मूळ प्रत, रहिवासी पुरावे, 3 वर्षांचा तलाठी अहवाल.

जातीचे प्रमाणपत्र : आॅनलाइन अर्ज, प्रतिज्ञालेख, टीसी, बोनाफाइड, रहिवासी पुरावे
अधिवास प्रमाणपत्र : प्रतिज्ञालेख, अर्ज, टीसी, जन्माचा दाखला, रहिवासी पुरावे.
उत्पन्न दाखला : प्रतिज्ञालेख, आॅनलाइन अर्ज, तलाठी चौकशी अहवाल, रहिवासी पुरावे.
पावती न पाहताच करतात सही
प्रमाणपत्राच्या पाठीमागे पावती लावल्याशिवाय प्रस्ताव स्वाक्षरीसाठी सादर करायचा नाही, असा नियम आहे. पण, तहसील कार्यालयातील काही अधिकारी पावती न पाहताच प्रमाणपत्रावर सही करीत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
माजी एसडीओंकडून हस्तक्षेप
सीएमएस कंपनीच्या व्यवस्थापकासोबत अकोल्याच्या माजी उपविभागीय अधिकार्‍याचे जवळचे संबंध आहेत. अकोला येथे असताना सेतू केंद्र संचालकांच्या पाठीवर त्यांचा हात होता. त्यामुळेच सेतू केंद्र संचालकांची हिंमत वाढली आहे. या अधिकार्‍याने सेतू केंद्रात होत असलेल्या गैरप्रकाराबाबत लिहिले जाऊ नये, यासाठीही प्रयत्न केले.
दाखल्यांचे दर व कालावधी
प्रमाणपत्रे निश्चित दर मिळण्याचे दिवस
रहिवासी प्रमाणपत्र 32.47 रुपये 3 दिवस
उत्पन्न दाखला 32.47 रुपये 3 दिवस
वय व अधिवास 32.47 रुपये 3 दिवस
जात प्रमाणपत्र 32.47 रुपये 15 दिवस
प्रतिज्ञालेख 32.47 रुपये 1 तास
नॉन क्रिमिलेअर 54.94 रुपये 15 दिवस
जन्म, मृत्यू दाखला 32.47 रुपये 3 दिवस
भूमिहीन दाखला 32.47 रुपये 3 दिवस

एसडीओंना अधिकार
४सेतू केंद्राविरुद्ध् तक्रार आल्यास उपविभागीय अधिकार्‍यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबत त्यांनी नियमितपणे भेट देऊन पाहणी करणे अपेक्षित आहे.
अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अकोला.
पावती द्यायला हवी
शहरातील बहुतांश सेतू केंद्रांकडून जादा पैसे आकारल्या जात आहेत. फी ठरवून दिली असल्याने जास्त पैसे घेण्याची गरज नाही. सेतू केंद्रांच्या मनमानीला आळा बसला पाहिजे. प्रत्येक सेतूमध्ये रेटबोर्ड असावा. प्रत्येक नागरिकाला पावती द्यावी.
साहेबराव इंगळे, सचिव, सुशिक्षित बेरोजगार टंकलेखन असोसिएशन अकोला.
सकाळपासून थांबलो
४गॅस सिलिंडरसाठी प्रतिज्ञालेख पाहिजे आहे. सकाळी 11 वाजतापासून नंबर लावला. दुपारचे 4 वाजले तरी अजूनही काम झाले नाही.
नितीन पारेख, खोलेश्वर मंदिराजवळ अकोला.
पाच तास प्रतीक्षा
४घर नावावर करायचे आहे. म्हणून सकाळी 10 वाजेपासून सेतू केंद्रावर आले. प्रतिज्ञालेखसाठी पाच तासांपासून प्रतीक्षा करीत आहे.
उषा हंसराज मीना, शिवणी खदान.