आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन ‘डे’ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, मोर्चा आणि उपोषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार हा आंदोलन ‘डे’ ठरला. बसपाच्या वतीने वेगळ्या विदर्भ राज्यासाठी, पातूर तालुक्यातील पर्यवेक्षिकेच्या बदलीसह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी महिलांचा मोर्चा व अखिल भारतीय सफाई मजदूर संघाच्या बेमुदत उपोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर बुधवारी गजबजलेला होता. ‘आमच्या मागण्या मान्य करा’चा नारा दिवसभर गुंजत राहिल्या. अ. भा. ब्राह्मण महासंघानेही जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले.
विदर्भ वेगळे राज्य करा : बसपा
बहुजन समाज पार्टीतर्फे बुधवार, 30 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यात शांततेत करण्यात आले असून, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. विकासासाठी विदर्भ हे वेगळा राज्य म्हणून घोषित करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत विदर्भाकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे आजही विदर्भ इतरांच्या तुलनेत मागे आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विविध संस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच याबाबतीत विदर्भातील जवळपास सर्व स्थानिक संस्थांच्या माध्यमातून ठराव देखील पारित करण्यात आले आहे.
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशिराम व बसपाच्या अध्यक्षा मायावती अनेक वेळा वेगळ्या विदर्भाच्या मुद्याच्या बाजूने संसदेत व बाहेरही विचार मांडतात. सध्या विकासाच्या दृष्टीने लहान लहान राज्यांची निर्मिती ही काळाची गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करुन विदर्भ वेगळे राज्य होणे अत्यावश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. धरणे आंदोलनात जिल्हा प्रभारी डॉ. एस. एस. तायडे, व्ही. एन. तायडे, एस. एस. मनवर, भगवान दंदी, मनीष म्हस्के, जागृती तेलगोटे, करुणा सिरसाट, नंदाबाई सिरसाट, इंद्रकला मोहोड, रत्ना गजभिये, वंदना सिरसाट, दुर्गा वाकोडे, कैलास वाकुडे आदी सहभागी आहेत.
अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील पर्यवेक्षिका ज्योती ठाकरे यांची बदली करण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 30 जुलैला अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांची प्रशासनासोबत झालेली चर्चा फिस्कटल्याने सायंकाळपासून युनियनच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.
यापूर्वी पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर 25 जून 2014 ला बेमुदत उपोषण सुरू केले होते. या वेळी झालेल्या चर्चेत श्रीमती ज्योती ठाकरे यांना पातूर येथे रुजू करून घेतले जाणार नाही, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले होते. परिणामी, उपोषण मागे घेण्यात आले, परंतु प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही. तसेच यासंदर्भात उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे युनियनने या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी 30 जुलैला अशोक वाटिका येथून जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. आशा मदने, रंजना राठोड, बालीताई पोहरे यांच्यासह पाच कर्मचार्‍यांनी उपोषण सुरू केले आहे. अशोक वाटिकेवरून निघालेल्या मोर्चात अँड.एस.एन.सोनोने, सुनीता पाटील, दुर्गा देशमुख, कुसुमताई हागे, रमेश गायकवाड, सरोज मूर्तिजापूरकर, सुरेखा ठोसर, भा.ना.लांडे, त्रिवेणी मानवटकर, आशा मदने, रामचंद्र धनभर, माधुरी परनाटे, नयन गायकवाड, रामदास ठाकरे, र्शीराम मोडक, मदन जगताप आदींसह अनेक सदस्य सहभागी झाले होते.