आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात फोफावतोय डोनेशनचा गोरखधंदा; कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांची लूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकरावी आणि पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी शहरातील महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट सुरू आहे. कमी टक्के असल्याचे कारण पुढे करून, नंतर याच विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेऊन प्रवेश दिल्या जात आहेत. डोनेशनच्या या गोरखधंद्यामुळे पालकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी शिक्षण विभागाने काही अटी घालून दिल्या आहेत. तसे वेळापत्रकही महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. मात्र, या वेळापत्रकानुसार कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू नसल्याचे चित्र आहे. दहावीचे निकाल लागल्यानंतर सर्वच महाविद्यालयांनी प्रवेश अर्ज देणे सुरू केले.

गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती येण्याच्या आधीच त्याची झेरॉक्स कॉपीवर प्रवेश देणेही सुरू केले आहे. प्रवेश पत्र त्याच विद्यार्थ्यांना दिल्या जात आहे की, ज्या विद्यार्थ्यांना टॉपचे गुण मिळाले आहेत. टॉपचे विद्यार्थी आणि कमी गुण मिळालेले विद्यार्थी, असा भेदभाव शहरातील नामांकित समजल्या जाणार्‍या महाविद्यालयांमध्ये सुरू आहे, तर अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत, म्हणून प्रवेश नाकारला जात आहे.
अकरावी, पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशाचा घोळ
महाविद्यालयांचा असाही डाव : नॅकचा ए दर्जा असल्यामुळे आम्ही 60 टक्क्यांच्यावरच गुण असणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश देतो. त्याखाली गुण असणार्‍यांना प्रवेश देतच नाही, असे काही महाविद्यालयांचे म्हणणे आहे. मात्र, नॅकचा दर्जा ‘ए’ असो की, ‘बी’ त्याचा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात कुठेही संबंध नसताना डोनेशनचा गोरखधंदा करण्यात येत आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांची होतेय ससेहोलपट : ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे गुण शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी असतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची अकरावी आणि पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी ससेहोलपट होत आहे. अशा विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी अडवणूक होत आहे. अशा विद्यार्थ्यांनी कोठे जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोडवर्डमध्ये केली जाते पैशाची मागणी
शिक्षण संस्थांकडून कोडवर्ड वापरून पैशाची मागणी केली जाते, यासाठी रोमन अंकाचा वापर केला जातो. प्रामुख्याने रोमन अंकातील पाच व दहा या आकड्यांचा वापर केला जातो. हे आकडे एका कोपर्‍यात लिहिण्यात येऊन लिपिकाकडे अर्ज पाठवला जातो. कोडवर्ड फक्त लिपिक आणि संबंधितालाच माहिती असतो. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील एखाद्या प्राध्यापकाची भेट घेतली, तर ते प्राध्यापक महोदय डोनेशनचा मंत्र विद्यार्थ्यांना देतात आणि डोनेशन घेऊन त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने व्हावे :
इतर शहरांप्रमाणे अकरावीची प्रवेश प्रक्रिया शहरातील सर्वच महाविद्यालयांमध्ये राबवल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. याकडे माध्यमिक शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
आता अ‍ॅडमिशन फुल्ल झाले :
आता अ‍ॅडमिशन फुल्ल झाले आहे, प्रवेश मिळणार नाही, आमच्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच आधी प्रवेश देण्यात येत आहेत, असे सांगून महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहेत.