आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटातला निखळ विनोद हरवला - दिग्दर्शक शेखर नाईक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अलीकडे मराठी चित्रपटातला निखळ विनोद हरवल्याची खंत चहूबाजूंनी व्यक्त होते. मात्र, त्यावर मात करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. पु. ल. देशपांडे हे नाव आपल्या निखळ विनोदासाठी मराठी मनात खोलवर रुजलेले आहे. त्यांचा हा निखळ विनोद आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असल्याची माहिती सिने दिग्दर्शक शेखर नाईक यांनी येथे दिली.
आपल्या आगामी ‘म्हैस’ चित्रपटाच्या निमित्ताने ते अकोल्यात आले असता आज १८ एप्रिलला त्यांनी "दिव्य मराठी'शी संवाद साधला. ते म्हणाले, अलीकडे विनोदी चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. मात्र, त्यातील विनोद हा सर्व कुुटंुबीयांनी एकत्रित अनुभवणे कठीणच.
पु. ल. देशपांडेंचा विनोद जर दृश्य स्वरूपात चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आला, तर नक्कीच सध्या जाणवत असलेली निखळ विनोदाची उणीव भरून निघेल. याच विचारांनी ‘म्हैस’ या कथेवर मराठी चित्रपट करण्याची कल्पना मी सुनीताबाई देशपांडे यांच्यासमोर मांडली अन् त्यांनी मला परवानगीही दिली. म्हैस ही पुलंच्या गोळाबेरीज पुस्तकामधील त्यांच्या कथाकथनातील गाजलेली कथा असून, रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीतील ही कथा आहे. कोकणातील वेगवेगळ्या स्वभावाचे लोक, गर्दीमध्ये कंडक्टरची उडणारी धांदल आदी एसटीसमोर म्हैस आडवी आल्यानंतर सुरू होते. एसटीतील प्रवासी पुढारी, मास्तर, मधु मलुष्टे, सुबक ठेगणी, बेंबट्या दामले, बगू नाना, ऑर्डली साहेब आदींसह नाट्यमय पंचनामा सर्वकाही प्रेक्षकांना निखळ िवनोद देणारा आहे.
चित्रपटाचे निर्माते नितीन घोटकुले असून पटकथा शेखर नाईक, चित्रा ढवळे, संवाद पु. ल. देशपांडे, संजय पवार, गीत श्रीपाद सुपनेकर, संगीत आनंद मोडक यांचे आहे. चित्रपटात प्रामुख्याने जितेंद्र जोशी, उषा नाडकर्णी, सतीश आळेकर, जयंत सावरकर, सुहास पळशीकर, यतीन कार्येकर, रमेश मेढेकर, प्रमोद पवार, जगन्नाथ निवंगुणे, प्रीती धाडवे, संजय मोने यांच्या भूमिका आहेत. येत्या २४ एप्रिलला तो राज्यभरात प्रदर्शित होत असून अकोल्यातील पहिल्या शोला मी उपस्थित राहणार आहे, असेही ते म्हणाले. तसेच चांदी अन् म्हैस चित्रपटात न्यायालयात सुरू असलेल्या वादाविषयी बोलताना त्यांनी सांगितले, की म्हैसचे संपूर्ण अधिकार माझ्याकडे असून ते मी सुनीताबाईंकडून रीतसर घेतले आहेत. त्याचसंदर्भात मी न्यायालयात दाद मागितली आहे. लवकरच निकाल येईल, असेही ते म्हणाले. या वेळी डाॅ. राजेश देशमुख, समीर नाफडे उपस्थित हाेते.