आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जांबुवंतराव धोटेंचे डोके ठिकाणावर आहे का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - श्री संत गजानन महाराजांबद्दल अनादर करणारे वक्तव्य करत विदर्भवीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जांबुवंतराव धोटे यांनी वाद ओढवून घेतला. नागपुरात 2 जुलैला त्यांनी केलेल्या वक्तव्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. जांबुवंतरावांचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल करत त्यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे. राजकारण्यांनी सामान्य व्यक्तींच्या श्रद्धास्थानांना धक्का लावू नका, अन्यथा जनभावनेचा उद्रेक होईल, असा इशाराही यानिमित्ताने नागरिकांनी दिला आहे.

विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या कार्यावरही धोटे यांनी आरोप केले आहेत. त्यामुळे संत गजानन महाराजांच्या तमाम भक्तांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भात लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या मनात, घरात, दुकानात, प्रतिष्ठानांमध्ये श्री संत गजानन महाराज विराजमान आहेत. महाराजांचे सर्व भक्त जाती, धर्माच्या भिंती तोडून श्रींच्या दर्शनासाठी एका रांगेत उभे राहतात. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असा भेद नसतो. संत गजानन महाराजांच्या शेगाव येथील दर्शनबारीत, प्रसाद वितरणात सामाजिक एकतेचे रोजच दर्शन घडते. संत गजानन महाराजांचे पिढ्यान्पिढ्या असंख्य कुटुंब भक्त आहे. शेगाव येथील संस्थानातील शिस्त, साफ स्वच्छता, कार्यक्रमांचे आयोजन, तिथे दिल्या जाणा-या देणगीचे होणारे समाजाभिमुख काम, संस्थानचे इतर सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, रोज जमा होणा-या देणगीचे मंदिराच्या आवारातील फलकावर होणारे जाहीर प्रगटन या माध्यमातून श्री संत गजानन महाराज संस्थानचा पारदर्शी कारभार जगासमोर आला आहे. तो इतर संस्थांसाठी अनुकरणीय आहे.

धकाधकीच्या जीवनात ‘आनंद सागर’ हा प्रकल्प लोकांमध्ये आनंद निर्माण करणारा सेतू झाला आहे. असे असताना केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी जांबुवंतराव धोटे यांनी केलेल्या आरोपांचा समाचार सामान्य व्यक्तींनी आज घेतला आहे. जनसामान्यांच्या श्रद्धास्थानांना धक्का लावू नका, अन्यथा जनभावनेचा उद्रेक होईल, असा सज्जड दमच नागरिकांनी भरला आहे.

वेगळ्या विदर्भासाठी लढा देणा-या धोटेंनी केवळ प्रसिद्धीसाठी असे वादग्रस्त वक्तव्य करू नये. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. इतर धार्मिक संस्थानांची शेगाव संस्थानशी तुलना करू नये, असे मत भाविकांनी आज व्यक्त केले. धोटेंच्या या वक्तव्याने त्यांची जनमानसात निर्माण केलेली आक्रमक व लढवय्या ही प्रतिमा धुळीस मिळवली असल्याची टीका सामान्य जनतेने व्यक्त केली.