आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरअखेर अकोल्यात आयुक्तालय होणारच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला शहरातील आयुक्तालयाचा प्रश्न गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. आयुक्तालय होणारच, अशी घोषणा यापूर्वीच त्यांनी केली आहे. या प्रश्नाला आज गृहराज्यमंत्री (ग्रामीण) प्रा. राम शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. आयुक्तालयाचा मुहूर्त निघाला असून, डिसेंबर २०१५ पर्यंत आयुक्तालय अस्तित्वात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. ते सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

प्रा. राम शिंदे हे नागपूर येथून मोटारीने अकोल्यात आले होते. त्यांची मोटार बाभुळगाव फाट्याजवळ नादुरुस्त झाली. त्यामुळे येथे काय थांबायचे म्हणून त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात जाणे पसंत केले. ते सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी बोलताना ते म्हणाले की, अकोल्यात आयुक्तालयाची गरज आहे. त्या दिशेने आम्ही काम सुरू केले आहे. आयुक्तालय निर्मितीची सर्व प्रक्रिया वेगाने होणार असून, डिसेंबरमध्ये आयुक्तालय अस्तित्वात येणार आहे. विशेष म्हणजे या वेळी पक्षकार्यकर्त्यांना त्यांच्या दौऱ्याविषयी अनभिज्ञता असल्यामुुळे एकही कार्यकर्ता हजर नव्हता. त्यांचे सर्व आदरातिथ्य सिव्हिल लाइन्स पोलिसांनी केले.

पोलिसांच्यागाडीत बसले गृहराज्यमंत्री
अमरावतीयेथून गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे त्यांच्या मोटारीने बुलडाणाकडे जाणार होते. मात्र, त्यांची गाडी बाभुळगाव फाट्याजवळ पंक्चर झाली. त्यामुळे गाडीचे पंक्चर काढण्यासाठी थांबली. गाडीचे टायर काढताना स्टेपनीचा नटच निघाल्यामुळे गाडी दुरुस्त करण्यास वेळ लागणार होता.

यावेळी राम शिंदे हे काही वेळ थांबलेही मात्र येथे थांबल्यापेक्षा जवळच्या पोलिस ठाण्यात थांबलो, तर जिल्ह्याचा आढावाही घेता येईल. या दृष्टीने त्यांनी जवळच्या सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे गाठण्याचा निश्चय केला. त्याच परिसरात सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे पेट्रोलिंंगवर असलेले पोलिसांचे वाहन आल्यामुळे गृहराज्यमंत्री त्या वाहनात बसले आणि सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात आले. या वेळी तत्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार सुभाष माकोडे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार हजर होते. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या वेळी गृहराज्यमंत्र्यांचे स्वागत केले.
पालकमंत्र्यांनी केला पाठपुरावा
गृहराज्यमंत्रीडॉ. रणजित पाटील यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून आयुक्तालयाचा प्रश्न गांभीर्याने घेतला. त्यांनी सर्वप्रथम आयुक्तालयाची घोषणा केली. त्यानुसार आयुक्तालयाचे कामही सुरू झाले. आयुक्तालयासाठी निधीची तरतूदही करण्यात आली असून, डॉ. पाटील यांच्या पुढाकारानेच प्रश्न मार्गी लागला.
तडीपारीचे आदेश आता पोलिसांनाही

शहरीभागात तडीपार करण्याचे अधिकार पोलिस आयुक्तांना आहेत. ग्रामीणमध्ये ते जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांना होते. महसूलकडून तडीपारीचे प्रकरणे निकाली निघण्याचे प्रमाण नगण्य असल्यामुळे अधिकार पोलिसांना देण्यात येणार अाहेत. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील तडीपारीचे प्रस्ताव डीजीच निकाली काढणार असल्याचे प्रा. शिंदे म्हणाले.
दारू अड्डे हुडकून काढण्याचे आदेश
मुंबईतगावठी दारूचे गेलेले बळी ही दु:खद घटना होती. त्याचा धडा पोलिसांनी घेतला आहे. उत्पादन शुल्क विभागाने दारूवर कारवाया करणे आवश्यक असतानाही गावठी दारूची विक्री होणे ही शोभनीय घटना नाही. या विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे राज्यातील पोलिसांना दारू अड्डे हुडकून काढण्याचे आदेश प्रा. राम शिंदे यांनी दिले आहेत.

गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांचे स्वागत करताना पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, ठाणेदार सुभाष माकोडे, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार .