आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात तिसर्‍या, चौथ्या स्थानावर दोन्ही काँग्रेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हा परिषद निवडणुकीत अवघे पाच गट जिंकून पक्षाची कामगिरी उत्तम असल्याचा दावा करणार्‍या काँग्रेसने विविध गटांमध्ये तिसर्‍या व चौथ्या स्थानावर दबदबा असल्याचे दाखवून दिले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस कणभर समोर होती. जिल्हा परिषद गटात दुसर्‍या क्रमांकाची मते घेणार्‍या पक्षांत भारिप-बमसं आघाडीवर आहे. या पक्षाच्या 25 पराभूत उमेदवारांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली. त्याखालोखाल शिवसेनेचे 11 तर काँग्रेसचे नऊ आणि भाजपच्या चार उमेदवारांनी दुसर्‍या स्थानापर्यंत मजल मारली. याशिवाय चार गटात अपक्षांनी दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवली.
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या गटात तिसर्‍या स्थानावर अग्रेसर राहिले. तिसर्‍या स्थानावर सर्वाधिक 17 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. पक्षाच्या 17 उमेदवारांनी तिसर्‍या स्थानावर दबदबा मिळवला, तर चौथ्या स्थानावरदेखील पक्षाची स्थिती तिसर्‍या स्थानासारखीच कायम होती. चौथ्या स्थानावरदेखील पराभूत 17 उमेदवार हे यादीत होते. तिसर्‍या स्थानावर काँग्रेसचे पराभूत 16 उमेदवार होते. चौथ्या स्थानावर 13 पराभूत उमेदवार काँग्रेसचे होते. पाचव्या स्थानापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ तर काँग्रेसचे तीन उमेदवार पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पराभवाची जबाबदारी पक्षाने निश्चित करण्याची गरज आता पक्षातील कार्यकर्त्यांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काँग्रेसमध्ये देखील पराभवाची जबाबदारी ही हमी घेणार्‍या नेत्यांवर कशी निश्चित केली जाते, याची वाट पक्षातील कार्यकर्त्यांद्वारे पाहण्यात येत आहे.
दोन्ही काँग्रेसने काही कोटी रुपये निवडणुकीसाठी खर्च केले असताना त्यांची कामगिरी बरी राहिलेली नाही. त्यामुळे पक्षानेदेखील आलेल्या निधीचे नियोजन काय केले, त्याचे ऑडिट करण्याची मागणी कार्यकर्त्यांद्वारे करण्यात येत आहे. दोन्ही काँग्रेसची पीछेहाट का झाली याची कारणमीमांसा शोधण्यासाठी पक्ष निरीक्षकांना पाठवते काय, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेसने उमेदवारी देताना नेत्यांकडून हमीपत्रच घेतल्याने त्यांना कारवाईसाठी शोधाशोध करण्याची गरज भासणार नाही. पण, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती जिल्हा परिषदेत कुणामुळे बिघडली, याची चाचपणी करण्यासाठी येत्या काळात पक्षाला सत्यशोधन समिती नियुक्त करावी लागेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.