आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress And Ncp, Group Ism Issue At Akola, Divya Marathi

महाआघाडीत बिघाडी- महाआघाडीतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेत भाजप-सेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी स्थापन झालेल्या महाआघाडीतून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. यानुषंगाने काँग्रेसचे महानगराध्यक्ष मदन भरगड यांनी काही नगरसेवकांसोबत बैठक घेऊन तसा प्रस्ताव तयार केल्याची विश्वसनीय माहिती आहे.

सन 2012 ला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. भाजप-काँग्रेसला प्रत्येकी 18 जागा मिळाल्या होत्या. पण, भाजपचे पाच बंडखोर नगरसेवकही निवडून आले होते. त्यामुळे सत्तेचा लोलक कोणत्याही गटाकडे जाऊ शकत होता. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने महानगर सुधार समिती, तर काँग्रेसने महाआघाडी स्थापन केली. परंतु, त्या वेळी खासदार संजय धोत्रे व विजय अग्रवाल यांच्यात कोणीही एक पाऊल मागे घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे काँग्रेसला आयतीच संधी मिळाली. स्वत:कडे अनुसूचित जाती गटातील नगरसेवक नसल्याने सात संख्याबळ असलेल्या भारिप-बमसंला काँग्रेसने महापौरपद देऊन महाआघाडीच्या माध्यमातून सत्ता हस्तगत केली.

जुळत नसल्यास सत्तेतून बाहेर पडा, असा इशाराही भारिप-बमसंने काँग्रेसला दिला. त्यानंतरही कुरबुरी थांबल्या नाहीत. रिलायन्सशी बोलणी करण्यावरून सत्ताधारी गटातच चांगली जुंपली. मात्र, महाआघाडीच्या या सव्वादोन वर्षांच्या कालावधीत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागले, तर समन्वयाच्या अभावामुळे शासनाने विकासासाठी कोट्यवधी रुपये देऊनही हा निधी खर्च झाला नाही. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी सत्ता हाती घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे पाचपैकी चार बंडखोर स्वगृही परतले आहेत. त्यामुळे भाजपचे स्वत:चे संख्याबळ 23 वर गेले आहे, तर महाआघाडीला बाहेरून पाठिंबा देणार्‍या पाच नगरसेवकांच्या गटानेही आता महाआघाडीपासून फारकत घेण्याचा विचार पक्का केला असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मुंबईत चिंतन बैठकीत महापौर मदन भरगड यांनी महाआघाडीतून बाहेर पडण्याचे मत व्यक्त केले होते.

भरगड दाखल झाल्यावर दोन्ही कॉँग्रेसच्या सात ते दहा नगरसेवकांच्या बैठकीत महाआघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. परंतु, महापौरांवर अविश्वास प्रस्ताव आणता येत नसल्याने महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतरही फायदा काय, असा प्रश्न काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे, तर काँग्रेसनेच महाआघाडी स्थापन केली असून, आघाडीचे अध्यक्षपदही काँग्रेसकडे आहे. बाहेर न पडता महाआघाडीत कोणा-कोणाला ठेवायचे? हा निर्णय अध्यक्षांनीच घ्यावा, असे मतही नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.

केवळ चर्चा केली
मुंबईत झालेल्या चिंतन बैठकीत महाआघाडीतून बाहेर पडावे, असे माझे मत मी व्यक्त केले. परंतु, नगरसेवकांसोबत बैठक घेऊन प्रस्ताव वगैरे तयार केलेला नाही. नगरसेवकांसोबत केवळ चर्चा झाली. अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांचा असेल. ते जो निर्णय घेतील, तो निर्णय काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना बंधनकारक राहील. मदन भरगड, काँग्रेस महानगराध्यक्ष