आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस , भाजपचे अकोल्यात एकत्र लॅँडिंग; शिवसेनेचा ‘ब्रेक’फास्ट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - एरवी विधिमंडळात अथवा जाहीररीत्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी न सोडणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते 6 सप्टेंबरला अकोल्यात एकाच हेलिकॉप्टरमधून ‘अवतरले’. काँग्रेस चे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री पतंगराव कदम, काँग्रेस नेते गणेश पाटील, भाजपचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे या नेत्यांनी एकाच हेलिकॉप्टरमधून येत ‘आम्ही सारे एकच’ असा संदेशच दिला.

अकोल्यात 6 सप्टेंबरला उपरोक्त दोन मंत्री आणि नेत्यांच्या विविध कार्यक्रम आणि बैठकांचे आयोजन केले होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकाच हेलिकॉप्टरमधून आल्याने उपस्थितांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. हे नेते आले तर एकत्र मात्र वेगवेगळ्या मार्गाने परतणे त्यांना सोयीचे वाटले.

आमदार बाजोरियांकडे काँग्रेस मंत्र्यांची ‘धाव’
काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शिवणी विमानतळावर हजेरी लावली. आमदार बाजोरिया यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी विमानतळावरच ‘संवाद’ही साधला तसेच ना. थोरात आणि वनमंत्री पतंगराव कदम या दोन्ही काँग्रेस नेत्यांनी आमदार बाजोरियांकडे भेट दिली.

सलामीवर ‘धुळ’
मंत्र्यांना सलामी देण्यासाठी पोलिस प्रशासनाने शिवणी विमानतळावर जय्यत तयारी केली होती. मात्र, हेलिकॉप्टर आल्यानंतर उडालेल्या धुळीमुळे सलामीवर काही अंशी पाणी फेरले गेले.सर्वत्र धुळीचे लोट पसरल्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली होती.

कार्यकर्त्यांची गर्दी
मंत्री आणि नेत्यांच्या स्वागतासाठी भाजप आणि काँग्रेस चे स्थानिक पदाधिकार्‍यांनी विमानतळावर एकच गर्दी केली होती. स्वागत करणार्‍यांमध्ये काँग्रेस चे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, रामदास बोडखे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाबाराव विखे पाटील, महेंद्रसिंग सलुजा आणि आमदार डॉ. रणजित पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, डॉ. किशोर मालोकार, दीपक मायी आणि शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया आदींचा समावेश होता. काँग्रेस आणि भाजप नेते एकाच हेलिकॉप्टरमधून उतरल्याने स्वागतासाठी आलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ संभ्रम निर्माण झाला आणि त्यांची धांदलही उडाली.