आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Candidates List Issue For Loksabha Election In Yawatmal

तयारी लोकसभा निवडणुकीची; काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची नावे पाकीटबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काँगे्रसमधील इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंगे्रसशी जागावाटपाबाबतचा निर्णय झाल्यानंतरच ही नावे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निवडणूक अभ्यासाच्या आधारावर सीट वाटपात आम्ही आता 26 ऐवजी 29 सीटची मागणी करत आहो. या आधीच्या निवडणुकीत कॉंग्रेसला 26 पैकी 17 तर राष्‍ट्रवादी काँग्रेसला 22 पैकी 8 जागेवर विजय मिळवता आला. आता मात्र आम्ही लोकसभेच्या 3 अतिरिक्त जागा मागत आहो. यासंदर्भात राष्‍ट्रवादीसोबत चर्चा झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. याव्यतिरिक्त इतरही धर्मनिरपेक्ष पक्षांना आघाडीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर आणि जोगेन्द्र कवाडे यांच्या सोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील आघाडी सरकारविरोधात ओबीसी समाजात काही गैरसमज निर्माण झाले आहे. ओबीसीसाठी शासनातर्फे शिक्षण फी अथवा परीक्षा फीबाबत जो पैसा दिल्या जातो, त्यामध्ये कुठलीच कपात केल्या जाणार नाही, असे झाल्यास ओबीसीसाठी स्वत: सरकार विरोधात लढेल, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या 8 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे यवतमाळ जिल्ह्यात येत आहे. बाभूळगाव येथे आयोजित केलेल्या सिंचन परिषदेला ते उपस्थित राहणार आहे. याचवेळेस ते डेहणी ठिबक सिंचन प्रकल्पाची पाहणी करणार आहे. कॅनालच्या तुलनेत ठिबकमध्ये चार पट अधिक सिंचन होते. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तसेच नेर तालुक्याला या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. माणिकराव ठाकरे यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास आणला आहे. शेतकºयांना देण्यात येणाºया सबसिडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येणार आहे. हा प्रश्न संपुष्टात आल्यास जवळपास 20 हजार एकर जमिनीवर बारामाही पीक घेण्याची किमया साकारल्या जाणार आहे, असेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार विजय खडसे, अरुण राऊत, अशोक बोबडे, मनमोहन चव्हाण, संध्याताई सव्वालाखे आदी उपस्थित होते.

राष्‍ट्रवादीने निर्णय स्पष्ट करावा
राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे सातत्याने वेगळी निवडणूक लढण्याचे वक्तव्य करत आहेत. या अनुषंगाने त्यांना छेडले असता आपला जो कुठला निर्णय असेल तो पक्षाने जाहीर करायला पाहिजे. आम्ही आघाडी करायला तयार आहोत. त्यांना वेगळे लढायचे असेल, तर त्यांनी तसे जाहीर करायला पाहिजे, असे म्हणत ठाकरे यांनी आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

मोदींचा प्रभाव नाही
भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी यांचा कुठलाच प्रभाव राज्यात पडणार नाही. महाराष्‍ट्रात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रभाव आहे. येथे जातीयवादी विचारसरणी असलेल्या नेत्यांचा प्रभाव पडू शकत नाही. काँग्रेसने धर्मनिरपेक्षपणे राज्याचा केलेला विकास महाराष्‍ट्रातील जनता विसरू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.