आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कासावार यांचा राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - काँग्रेसमधील दुय्यम फळीतील पदाधिकार्‍यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात पुकारलेले बंड आजही शमले नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी पत्रकार परिषद बोलावून आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे घोषित केले. विशेष म्हणजे, आगामी विधानसभा मी अथवा माझा पुत्र लढणार नाही, अशी घोषणा त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात आमदारांखालोखाल मान असणार्‍या दुसर्‍या फळीतील काँग्रेस पदाधिकार्‍यांनी काल बुधवारी यवतमाळात गोपनीय बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. एवढेच नव्हे, तर काँग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांनी येणारी विधानसभा लढवायची नाही तसेच त्यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्याला उमेदवारी न देण्याची मागणी श्रेष्ठींकडे करणार असल्याची माहिती दिली. या घोषणेमुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कासावार अस्वस्थ झाले. त्यांनी आज 26 जून रोजी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांसमक्ष सही करून आपल्या पदाचा राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवत असल्याचे घोषित केले. वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत आपण काळजीवाहू अध्यक्ष राहून पक्षाची जबाबदारी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक मी अथवा माझा पुत्र लढणार नाही, अशीही घोषणा केली. या पदाधिकार्‍यांनी मला प्रत्यक्ष भेटून राजीनामा देण्याचे सूचित केले असते, तरी मी राजीनामा दिला असता, असेही कासावार यांनी स्पष्ट केले. ही पक्षांतर्गत बाब असताना मला न सांगता थेट पत्रकार परिषदेत सांगितल्यामुळे कासावार यांनी नाराजी व्यक्त केली.

नौटंकीबाजांचे कारस्थान
काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीमध्ये काही नौटंकीबाज सहभागी झाले होते. वरिष्ठांचा मान न ठेवणे, आदेशाचे पालन न करणार्‍यांची फौज घेऊन चाललो असतो, तर विधानसभेत त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले असते. त्यामुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचे सांगून या पदाधिकार्‍यांवर कासावार यांनी हल्ला चढवला. अर्थात सर्वच नौटंकीबाज नसल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. पक्षात आता शिस्त राहिली नाही, अशी स्पष्ट कबुली दिल्याने काँग्रेसमध्ये यादवी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसची जिल्ह्यात सरशी
आपल्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात काँग्रेसची सरशी झाली. जिल्ह्यात एकाचे पाच आमदार झाले. लोकसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग समाविष्ट असलेल्या हिंगोलीतून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. जिल्ह्यात काँग्रेस वाढल्याचे सांगून आपण कुठेही चुकलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नेत्याचा ‘हात’ नाही
काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याचा या प्रकरणात तूर्तास तरी ‘हात’असल्याचे समोर आलेले नाही. जिल्हाभरातील दुसर्‍या फळीतील सर्व वरिष्ठ पदाधिकारी एकत्र आल्याने या मागे कुणीतरी जिल्ह्यातील वरिष्ठ नेता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, कासावार यांनी आपल्याला या प्रकरणात तसला प्रकार दिसला नसल्याचे सांगितले.
निवडणुकीतून माघार कुणाची
आमदार वामनराव कासावार यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या मागणीनुसार आता राळेगावचे काँग्रेस आमदार वसंतराव पुरके, आर्णीचे शिवाजीराव मोघे, उमरखेडचे विजय खडसे हे येत्या निवडणुकीत उमेदवारी आपल्याच घरात न ठेवता, निवडणूक न लढण्याचा निर्णय घोषित करतात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पवारांचा निर्णय श्रेष्ठींचा
शरद पवार यांना आघाडीची सूत्रे द्यायची अथवा नाही, हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे. वरिष्ठ जो आदेश देतील तो आम्ही पाळणार. आघाडी झाल्यास सहकार्यात निवडणूक लढू आणि आघाडी न झाल्यास स्वतंत्र लढू. अखेर पक्षश्रेष्ठींचाच अंतिम आदेश स्वीकारल्या जाईल, असे स्पष्ट करून पदाधिकार्‍यांच्या मागणीला कासावार यांनी छेद दिला.