आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress General Secretary Rajesh Bharti,latest News In Divya Marathi

संन्याशाला फाशी नको, काँग्रेसचे महासचिव राजेश भारतींची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पक्ष विरोधीकारवाया केल्याच्या नावाखाली कारवाई करताना चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जात आहे. हा प्रकार बंद करा. आधी पक्षाला आव्हान देत थेट पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा आणि त्यानंतर कार्यकर्त्यांवर, अशी मागणी अकोला जिल्हा काँग्रेस समितीचे महासचिव राजेश भारती यांनी एका पत्रकातून केली आहे.
जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती नाजूक आहे. या परिस्थितीची कल्पना पुरेपूर माहिती असतानाही काही जबाबदार नेत्यांनी काँग्रेस पक्ष संपवण्याचा जणू चंगच बांधला आहे. जिल्ह्यामध्ये उमेदवारी देताना निष्ठावंतांना विश्वासात घेणे गरजेचे होते, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजीचा उद्रेक झाला. हा उद्रेक होऊ देण्याचे काम होणे गरजेचे होते. परंतु, उद्रेकाला शांत करताना त्याला भडकवून स्वत:च्या सोयीच्या राजकारणासाठी याच्या त्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून पक्षातील ताकदवर कार्यकर्त्यांनाच संपवण्यातच नेत्यांनी धन्यता मानली. मीच खरा निष्ठावान, हे दाखवण्यासाठीही हा प्रकार झाला असावा. त्यामुळे अनेकांवर निलंबनाची कारवाई झाली. माझ्यावरील निलंबन मागे घेण्यात आले. परंतु, या षड््यंत्रात बळी गेलेल्या अन्य नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची साधी विचारपूसही पक्षाने केली नाही. एखाद्याने तक्रार केल्यानंतर या तक्रारीची शहानिशा करणे, किमान कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांना जाब विचारणे हे क्रमप्राप्त होते. परंतु, असे करता पक्ष कुमकुवत करून आपल्या अंतर्गत विरोधकांना थेट पक्षाबाहेर हाकलून देण्याचे घृणास्पद कटकारस्थान काहींनी केले. अनेक कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, हे आधीपासून माहिती असताना त्यांना थांबवता आले असते. फक्त गरज होती संवादाची. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांना मान देण्याऐवजी काही उमेदवारांनी स्वत:चा अंहकार कायम ठेवून पक्षाची भयावह स्थिती केली. ज्यांना पक्षाकडून काहीही मिळाले नाही, तेच आज काँग्रेस पक्षासोबत उरले आहेत. त्यामुळे यापुढे तरी किमान चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार पक्षाने बंद करावा, अशी आर्जवी मागणी राजेश भारती यांनी केली आहे.