आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आश्वासनां'चा सुकाळ, ‘पूर्ती’चा दुष्काळ; काँग्रेसच्या सत्तेत अकोल्याची दैनावस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- काँग्रेसचे मुख्यमंत्री केवळ आश्वासनांचा पाऊस पाडण्यासाठीच अकोल्यात येतात की काय, असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. अकोल्यात सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांची भली मोठी यादी वाचून दाखवली. आपण आलो म्हणजे अकोल्याच्या सर्व समस्या दूर करूनच जाऊ, अशा आवेशात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका महिन्यात सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आता त्याला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी एकाही आश्वासनाची संपूर्ण पूर्तता झालेली नाही. त्यातच शनिवारी मुख्यमंत्री पुन्हा अकोल्यात येऊन वचनपूर्ती यात्रा काढणार आहेत.

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची अकोल्यात येऊन आश्वासन देण्याची परंपरा आहे. या अगोदरच्या अकोला मनपाच्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी स्वराज्य भवनात जाहीर सभा घेऊन काँग्रेसच्या हातात सत्ता दिली तर शहर दत्तक घेऊन कायापालट करू, असे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून अकोलेकरांनी काँग्रेसच्या हातात सत्तेची सूत्रे दिली.

काँग्रेसने सत्ता उपभोगली तरी शहराचा कायापालट होण्याऐवजी अधोगती झाली. फेब्रुवारी 2012 मध्ये झालेल्या अकोला मनपा निवडणुकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अकोल्यात सभा घेऊन पुन्हा स्व. विलासराव देशमुख यांचा कित्ता गिरवला. पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासराव देशमुखांच्या पावलावर पाऊल टाकत शहर दत्तक घेण्याचा पुनरुच्चार केला.

भारिप-बमसंच्या सहकार्याने पुन्हा सत्ता काबीज केली. मात्र, अकोल्याचे दुर्भाग्य काही बदलले नाही. शहराच्या समस्यांमध्ये भर पडला असून, मनपामध्ये सत्ताधार्‍यांच्या गटबाजीला उधाण आले आहे. काँग्रेस व भारिप-बमसंचे नेते आरोप-प्रत्यारोप करण्यातच मग्न आहेत.

केवळ ‘कमिशन’वरूनच मनपामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. दत्तक घेण्याची भाषा बोलणार्‍या मुख्यमंत्र्यांनीही अकोला मनपाला वाळीत टाकले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अकोला मनपाला निधी देण्यात व खमक्या अधिकारी देण्यात त्यांनी सदैव दुर्लक्ष केले. आता तर विनाआयुक्त मनपाचा गाडा हाकण्यात येत आहे.

अकोला जिल्ह्यातही अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. मार्चमध्ये पृथ्वीराज चव्हाण अकोल्यात येऊन गेले. आपल्या भेटीदरम्यान त्यांनी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करताना ते एका महिन्यात मार्गी लावण्याचे अभिवचन दिले होते. त्या आश्वासनांची परिपूर्तता होणे दूरच, साधा पाठपुरावाही प्रशासनाने केला नाही.

मुख्यमंत्री असो की मंत्री ते आपली आश्वासन देण्याची भूमिका चोखपणे बजावतात. मात्र, त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळून आश्वासनांची परिपूर्तता करण्याची अपेक्षा अकोलेकरांची आहे.

स्वराज्य भवनच का?
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी काँग्रेसकडून स्वराज्य भवनचे मैदानच निवडण्यात येते. मुख्यमंत्री व काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या सभेसाठी मोठी मैदाने निवडणे अपेक्षित असते. मात्र, त्या सभेला गर्दी जमा झाली नाही, तर स्थानिक नेत्यांचीच गोची होईल. त्यामुळे आपले छोटे मैदानच बरे, असे म्हणून स्वराज्य भवन मैदानाला प्राधान्य दिल्या जाते. स्वराज्य भवनातही मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दी कशी जमवल्या जाते, हे आता सर्वसामान्य नागरिकांनाही चांगलेच कळून चुकले आहे.

असा आहे कारंजा दौरा
शनिवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री चव्हाण यांचे अमरावती येथे विमानाने आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने कारंजालाडकडे प्रयाण करतील. सकाळी 11.15 वाजता कारंजा येथील हेलिपॅडवर आगमन. 11.30 वाजता विद्याभारती विद्यालयाच्या मैदानावर वचनपूर्ती यात्रेचे उद्घाटन. 1.35 वाजता कारंजा येथून अकोला येथे हेलिकॉप्टरने प्रयाण.

काँग्रेससह शहराची अधोगती
अकोला जिल्ह्यात गटातटाच्या राजकारणात काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे, यात कुणाचेही दुमत नाही. जिल्ह्यात काँग्रेसचा निवडून आलेला एकही आमदार नाही. भारिप-बमसंचा आधार घेऊन मनपात सत्ता प्राप्त केली. मात्र, त्या ठिकाणीही काँग्रेस-भारिप-बमसंच्या भोंगळ कारभाराचा फटका अकोलेकरांना बसत आहे. त्यामुळे काँग्रेससोबतच आता अकोला शहराचीही अवस्था बिकट झाली असून, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.