आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिपशी आघाडी नको, काँग्रेस नेत्यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - भारिप-बमसंसोबत काँग्रेसने आघाडी करू नये, अशी एकमुखी मागणी काँग्रेस नेत्यांनी येवता येथील बैठकीत केली. रविवारी झालेल्या या बैठकीत पक्ष निरीक्षक झिया पटेल व अंजली टापरे यांची उपस्थिती होती.

काँग्रेससोबत आघाडी केल्यामुळे भारिप-बमसं महापालिकेत सत्तेत आहे. पण, आता जिल्हा परिषद निवडणुकीत भारिप-बमसंसोबत आघाडी नको, अशी एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष र्शावण इंगळे यांच्या फार्म हाऊसवर ही बैठक झाली. या वेळी उपस्थित पक्ष निरीक्षक झिया पटेल व अंजली टापरे यांनी पक्षर्शेष्ठींना या मागणीबाबत अवगत करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष बाबाराव विखे पाटील यांना स्वबळावर जिल्हा परिषद निवडणूक लढण्याचा आदेश देण्यात आला. पक्षातील इतरांना या बैठकीपासून दूर का ठेवण्यात आले, असा प्रश्न या मिटिंगमध्ये उपस्थित करण्यात आला. भारिप-बमसंसोबत जिल्हा परिषद व महापालिकेत सत्ता भोगल्यानंतर आता विरोध का, असा प्रश्न काही काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला. या बैठकीत बाबासाहेब धाबेकर, सुधाकर गणगणे, लक्ष्मणराव तायडे, अजहर हुसेन, महेंद्रसिंग सलुजा, दादाराव मते पाटील, विजय देशमुख, रफिक सिद्दीकी, मदन भरगड, बाबाराव विखे पाटील, राजेश भारती, मोहम्मद बद्रुजमा, शिवाजीराव देशमुख, हिदायत पटेल, र्शावण इंगळे, हेमंत देशमुख, डॉ. संजीवनी बिहाडे, तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य व इच्छुक काही उमेदवारांचा समावेश होता.

आधी हिशोब द्या
भारिप-बमसंसोबत आघाडी करा, अशी मागणी काँग्रेस महासचिव राजेश भारती यांनी केली. महापालिकेत सत्तेत आघाडी चालते आणि जिल्हा परिषदेत का नाही, असा प्रश्न या महासचिवांनी विचारला तसेच एका दुसरे महासचिव मोहम्मद बद्रुजमा यांनी गेल्या निवडणुकीत विजयी होण्याची ग्वाही देत कार्यकर्त्यांसाठी तिकीट मागणार्‍या नेत्यांनी विजयी उमेदवारांचा हिशोब द्यावा, अशी मागणी केली. महासचिवांनी केलेल्या उघड बंडखोरीमुळे पक्षात मात्र चांगलीच चर्चा होती.

सासरे उपाशी
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांची संख्या दोन अंकी आकड्यात पोहोचली नाही. त्यामुळे यंदा तरी जावयाच्या नेतृत्वात पक्षाने तो गाठावा, अशी अपेक्षा पक्षातील एका वरिष्ठ नेत्याला होती. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा सायंकाळ 7 वाजताची जेवणाची वेळ चुकवली व रात्री 10 पर्यंत उपाशी राहिले, याची जाणीव सूत्रसंचालकाने या वेळी आवर्जून करून दिली.

जागा 27, उमेदवार एक
जिल्हा परिषदेत 53 जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी इच्छुकांची गर्दी आवश्यक होती. ती या काँग्रेस मेळाव्यात नव्हती. या 53 पैकी 27 जागांवर महिलांना उमेदवारी देण्याची आवश्यकता आहे. पण, केवळ डॉ. संजीवनी बिहाडे या एकमेव महिला उमेदवार या मेळाव्यासाठी उपस्थित होत्या. उर्वरित 26 जागांवरील महिला उमेदवार मिळतात की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.