आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Consumer Forum Chairman Get Salary Like District Judge

ग्राहक मंचाच्या अध्यक्षांनाही जिल्हा न्यायाधीशांप्रमाणे मिळणार वेतन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा न्यायाधीशांप्रमाणेच जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षांना वेतन देण्याचा मॅटचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे.त्यामुळे,राज्यभरातील जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष, माजी अध्यक्षांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षांची १० वर्षांसाठी नियुक्ती केली जाते. महाराष्ट्र कंझ्युमर प्रोटेक्शन रुल नुसार जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षांना जिल्हा न्यायाधीशांच्या बरोबरीने वेतन द्यावे लागते. दरम्यान,२००३ आणि २००६ ला केंद्र राज्य शासनाने जिल्हा न्यायाधीशांच्या पे स्केल रिवाईज केल्या. परंतु, जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षांना याचा लाभ मिळाला नाही. या अनुषंगाने जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षांनी शासनाकडे पत्र व्यवहार केला. परंतु, त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.त्यामुळे, जिल्हा ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष विजयसिंह राणे यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. मॅटने विजयसिंह राणे यांच्या बाजूने निकाल देत, जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षांनाही जिल्हा न्यायाधीशांप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय दिला.

मॅटच्या या निर्णयाला राज्य शासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. सुनावणीत न्यायालयाने शासनाची याचिका फेटाळून लावत मॅटचा निर्णय कायम ठेवला.

त्यामुळे,राज्यभरातील जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्ष, माजी अध्यक्षांना दिलासा मिळाला असून, जिल्हा न्यायाधीशांप्रमाणेच आता वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात शासनाची बाजू अॅड.मालधुरे यांनी मांडली, तर विजयसिंह राणे यांची बाजू अॅड.आनंद राजन देशपांडे यांनी मांडली.