आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporation School Compition With Private School

महापालिकेची एक शाळा खासगी शाळांना पडतेय भारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एकीकडे महापालिका शाळांना उतरती कळा लागली आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्याच एका शाळेचा आलेख चढता आहे. सेमी इंग्रजी माध्यमाची व्यवस्था असलेली विशेष म्हणजे स्लम भागातील ही महापालिकेची शाळा खासगी शाळांना आव्हान देत प्रगतीचा एक एक टप्पा गाठत आहे.

मनपा शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याने तसेच सोयीसुविधांच्या अभावामुळे आज महापालिका शाळा ओस पडू लागल्या आहेत. १२ वर्षांत ६२ टक्के विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे १३ वर्षांत २२ शाळा बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली आहे. परंतु, प्रयत्न, जिद्द तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले व दर्जेदार शिक्षण मनपाच्या शाळांमधून िमळावे, यासाठी नगरसेवक, शिक्षक यांनी पुढाकार घेतल्यास शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावू शकतो. ही बाब महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ ने सिध्द केली आहे. महापालिकेच्या इतर शाळांचा आलेख घसरता असताना, ही शाळा मात्र यास अपवाद ठरली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. या शाळेत सर्व सुविधा उपलब्ध असल्याने तसेच शाळेतील सर्वच शिक्षक माझी शाळा व माझे विद्यार्थी म्हणून कार्यरत असल्याने शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारल्याने ही शाळा परिसरातील खासगी शाळांसाठी आव्हान ठरली आहे.

१३ वर्षांत झाली १२७ टक्के वाढ
ही शाळा १९९७ -१९९८ या शैक्षणिक वर्षात सुरु झाली. २००२-२००३ या वर्षात या शाळेत २३० विद्यार्थी शिक्षण घेत होते. तर चालु वर्षात ही संख्या ५५३ वर पोचली आहे. या १३ वर्षात विद्यार्थ्यांची १२७ पटीने वाढ झाली आहे.

शिक्षकांचेही योगदान
शाळेत केजी-१ व केजी-२ वर्ग सुरू केले आहेत. या वर्गावर नियुक्त केलेल्या शिक्षिकेचे वेतन देणे शक्य नसल्याने शाळेतील सर्व शिक्षक आपल्या वेतनातून या दोन शिक्षिकेंचे वेतन देतात. यामुळे इतर शाळा आणि शिक्षकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

सर्व सुविधा उपलब्ध
डेस्क बेंच, उद्यान, वाचनालय, संगणक प्रशिक्षण, शुद्ध पिण्याचे पाणी (आरो) आदी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तर आता नववा व दहावा वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने शाळेत प्रयोगशाळाही लवकरच सुरू होत आहे.
चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्न
शिवसेना वसाहतीत कामगार वर्ग अधिक प्रमाणात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत भरमसाट शुल्कामुळे प्रवेश घेता येत नाही. त्यामुळेच शाळेत दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे.'' -दिलीप देशमुख, नगरसेवक, महापालिका.
सेमी इंग्रजीची व्यवस्था
खासगी शाळांसोबत स्पर्धा करण्यासाठी या शाळेत पाचवीपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, चालू शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पहिलीपासूनच सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आला आहे.