आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्मिळ क्रौंच पक्ष्यांचा विदर्भात विहार, बारहेडेड गुज पक्ष्यांच्या दर्शनाने पक्षिमित्र सुखावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विदर्भातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ परिसरातील जलाशयांवर दरवर्षी पाहुणे पक्षी येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून येणार्‍या क्रौंच (क्रेन), राजहंस (बारहेडेड गुज) व राेहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे पक्षिप्रेमी, अभ्यासकांना विशेष आकर्षण असते. यंदा वाशीममध्ये रोहित तर अकोला, अमरावती जिल्ह्यात कॉमन क्रेन, डेमोसील क्रेनने हजेरी लावली.

दरवर्षी अकोला जिल्ह्यातील कापशी, दगडपारवा, दुधाळा, बोरगाव मंजूचा मच्छी तलाव, काटेपूर्णा जलाशय, विझोरा, कुंभारी तलाव, तर खामगाव तालुक्यातील विहीगाव या जलाशयांवर परदेशी पक्षी मोठ्या संख्येने येतात. यामध्ये पाणडुबी (लिटील ग्रीब), पाणकावळे (कारमोरंट), छोटा पिसारी बगळा (लिटील इग्रेट), रंगीत करकोचे (पेंटेड स्टॉर्क), उघड्या चोचीचे करकोचे (ओपनबिल स्टॉर्क), शुभ्रमानेचा करकोचा (वुलीनेक स्टॉर्क), काळा अवाक (ब्लॅक आयबीज), पांढरा अवाक (व्हाइट आयबीज), चक्रवाक (रुडी शेलडक), छोटा मराल (लेसर विसलिंग डक), सररुची (नॉर्दर्न पिनटेल), प्लवा बदक (स्पॉटबील डक), लाल डोक्याचा बदक (रेड क्रेस्टेड पोचर्ड), चांदी (कॉमन कुट), शेकाट्या (ब्लॅक विंग्ड स्टिल्ट) आदींसह अनेक प्रकारचे चिखलपावटे (वेडर्स) पक्षी आपल्या भागात येतात. मागील काही वर्षांपासून यामध्ये क्रेन म्हणजेच क्रौंच पक्ष्यांचीही भर पडली आहे.

अकोल्यात ४ वर्षांपूर्वी दुधाळा तलावावर सर्वप्रथम ५८ डेमोसील क्रेन आढळले होते. त्यानंतर कुंभारी तलावावरही दिसून आले. २५ जानेवारीच्या सुमारास जिल्ह्यातील जलाशयावर क्रौंच पक्षी आढळून आले. अकोल्यातील बोरगाव मंजू येथील मच्छी तलावावर ३२ डेमोसील क्रेन पक्ष्यांचा थवा सध्या मुक्कामास आहे, तर कॉमन क्रेन पक्ष्यांचेही दर्शन घडले. क्रेन कुळातील पक्षी मुख्यत्वे उथळ व दलदली प्रदेश, शेत परिसरात आढळतात.

क्रौंच पक्ष्यांच्या आठ प्रजाती
जगभरात क्रौंच पक्ष्यांच्या ८ जाती आढळतात. यापैकी भारतात ४ असून, सायबेरियन क्रेन २००२ मध्ये लुप्त झाल्या. आता सारस क्रेन, डेमोसील क्रेन, कॉमन क्रेन आढळतात. सारसाला एकाच भौगोलिक क्षेत्रात निवास करणे पसंत आहे, तर कॉमन, डेमोसील क्रेन लांबवरचा प्रवास करतात. भारताचा उत्तर, उत्तर-पूर्वी, उत्तर-पश्चिमी व नेपाळ परिसरात वावर दिसून येतो. वनस्पती, कंद, पाने, फळे, बिया, शेंगा त्यांचे खाद्य आहे.

संकटग्रस्त पक्षी
नष्ट होणारी शेतजमीन, जंगले आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे क्राैंच पक्षी धोकाग्रस्त झाले आहेत. मोठ्या आकाराचे हवेत उंचावर उडणारी एकमेव प्रजाती असून, भारतातही अनेक भागांतून हे पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

जलाशयांचे संरक्षण गरजेचे
अकोला जिल्ह्यातील जलाशयांवर दरवर्षी विविध प्रजातीचे स्थलांतरित पक्षी हजेरी लावतात. यंदा क्रौंच पक्ष्यांची भर पडली आहे. मात्र, या पाहुण्या पक्ष्यांना मानवी हस्तक्षेप, जलाशयाच्या आसपासच्या जमिनीवरील अतिक्रमण, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर घातक ठरतो. त्यांच्या अधिवासांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. - लक्ष्मीशंकर यादव, पक्षी अभ्यासक