आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबांचा खेळ पाहून तरुण झाले उत्साहित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सकाळी मैदानावर बॉलिंग करणारे, बॅटिंग करणारे, चीअरअप करणारे आजी-आजोबा पाहून मैदानावर खेळणारे चिमुकले आश्चर्याने थक्क झाले. भारत विद्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर रविवारी ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांमध्ये क्रिकेटचा सामना रंगला. बर्‍याच वर्षांनंतर चेंडू हातात घेणार्‍या आजोबांचा खेळ पाहून तरुण मुलंदेखील भारावली होती.

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अकोल्यात प्रथमच अशा क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांचा ‘नमो नम:’ संघ विरुद्ध 25 वर्षांआतील युवकांचा ‘यंग एलेव्हन’ संघ यांच्यात सामना झाला. सागर शेगोकार यांच्याहस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. यंग एलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करत 138 धावा काढल्या. आजोबांनी टाकलेले अनेक चेंडू त्यांनी सहज सीमारेषेच्या बाहेर टोलवले. प्रत्येक चेंडूवर निघणार्‍या धावांसोबतच आजोबांचा उत्साह वाढत होता. मैदानावर एखाद्या तरुणाप्रमाणे खेळणारे आजोबांना पाहून सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते.

मैदानावर खेळणार्‍या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघातील सभासद हजर होते. आपल्या साथीदारांना चीअरअप करणार्‍या आजोबा-आजींसोबत त्यांचे नातवंडदेखील सहभागी झाले होते. साठी ओलाडल्यानंतरही मोठय़ा जोमाने खेळणार्‍या आजोबांनी 138 धावांचे आव्हान पेलत फलंदाजी केली. मात्र, त्यांचा 99 धावांनी पराभव झाला. यंग एलेव्हन संघाचा कर्णधार मोहित जसवानी समानावीर ठरला, तर नमो नम: संघातील प्रवीण मुळे यांना विशेष बक्षीस देण्यात आले.
टीम नमो नम:
ज्येष्ठ नागरिक संघाच्या नमो नम: संघात कर्णधार प्रभाकर पाटणकर, उपकर्णधार सुहास काटे, अरुण पांडे, अरुण परांजपे, प्रवीण मुळे, जयंत जोशी, र्शीकांत देशमुख, हेमंत बेंडे, उमेश मानेकर, श्याम नेने, युवराज पागृत यांचा समावेश होता. अशोक ढेरे आणि नंदू गोरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चौथमल सारडा, सुधीर मुलमुले, दिलीप काकडे, शकूनल परांजपे, छाया कडू, चंद्रप्रभा चौधरी, उषा बोपडीकर, स्वप्ना देशपांडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आम्ही पण खेळणार
आजचा पुरुषांचा सामना पाहून महिलांसाठीदेखील आम्ही सामना आयोजित करणार आहोत. त्यांच्या उत्साह पाहून आम्हाला एक प्रकारे प्रोत्साहन मिळाले. आता आम्ही पण क्रिकेट खेळणार आहोत. शकूनताई परांजपे, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ.

25 वर्षांनंतर खेळलो
तरुणपणी नेहमी क्रिकेट खेळायचो. कॉलेजमध्ये, नोकरी करत असताना बर्‍याच स्पर्धांमध्ये भाग घेतला. आज 25 वर्षांनंतर क्रिकेट खेळलो. 72 वर्षांचा झालो तरी खेळू शकतो, याचा फार आनंद आहे. अशा उपक्रमांचे नेहमी आयोजन व्हावे. प्रभाकर पाटणकर, कर्णधार, नमो नम: संघ