आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवरखेडला वडील, भावाची निर्घृण हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवरखेड - आठवडी बाजाराजवळ राहणार्‍या आझाद खाँ यांच्या कुटुंबीयामधील थोरल्या मुलाने 7 एप्रिल रोजी सकाळी कौटुंबिक कलहातून वडील आणि सख्ख्या भावावर सुरीने वार केले. उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. आझाद खाँ तमीज खॉँ (वय 62), फैयाज खाँ आझाद खाँ (वय 30) अशी मृतांची नावे आहेत.
आझाद खाँ हे त्यांच्या अंगणात बांधलेल्या म्हशीला वैरण घालत होते. या वेळी त्यांचा मोठा मुलगा अय्याज खाँ (वय 38) तिथे आला आणि त्याने जुने भांडण उकरून वडिलांशी वाद घातला. दरम्यान, अय्याजच्या संतापाचा पारा चढून काही कळायच्या आत त्याने वडील आझाद खाँ यांच्यावर सुरीने वार करायला सुरुवात केली. ही बाब लक्षात येताच वडिलांना वाचवण्यासाठी त्यांचा लहान मुलगा फैयाज खॉँ मध्ये आला. अय्याजने त्याच्यावरही सुरीने वार केले. यात दोघे बापलेक गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी अय्याजविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
नागरिकांना दाखवली सुरी
अय्याज हा वडील आणि भावावर सुरीने वार करत असताना परिसरातील नागरिक त्यांना वाचवण्यासाठी आले. पण, अय्याजने त्यांनाही सुरी दाखवत त्यांच्या अंगावर धावून गेला. परिणामी, मदतीसाठी आलेले नागरिक मागे फिरले.
आझाद खाँ यांना 14 अपत्य
या घटनेत मृत झालेल्या आझाद खाँ यांना 11 मुले तर 3 मुली आहेत. या सर्व भावांमध्ये किरकोळ कारणांवरून नेहमीच आपसात वाद होतात. त्यामुळेच हे सर्वजण वेगवेगळे राहतात. संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड झाले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.