आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Bakharabad Masscra, Divya Marathi, Akola

बाखराबाद हत्याकांडातील आरोपींना 21 पर्यंत कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूर - संपूर्ण जिल्ह्यास हादरून सोडणार्‍या बाळापूर तालुक्यातील बाखराबाद येथील माळी परिवारातील तीन पुरुष व एक महिला, अशा चार जणांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले. बाळापूर न्यायालयाने तीनही आरोपींना 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या बाखराबाद येथील विवादित शेतजमिनीचा निकाल शुक्रवारी 4 एप्रिलला भगवंतराव माळी यांच्या बाजूने लागला. शेतीचा ताबा असलेले गजानन वासुदेव माळी (58), नंदेश गजानन माळी (28), दीपक गजानन माळी यांनी सोमवारी 14 एप्रिलला सायंकाळी 5.30 च्या सुमारास भगवंतराव माळी यांचा मुलगा योगेश माळी व त्याची चुलत बहीण वनमाला माळी यांची शेतामध्ये हत्या केली. राजेश माळी तसेच विश्वनाथ माळी यांची विश्वनाथ माळी यांच्या राहत्या घरी कुर्‍हाडीने घाव घालून हत्या केली. याप्रकरणी उरळ पोलिसांनी आरोपी गजानन वासुदेव माळी व त्यांची दोन मुले नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी यांना अटक करून त्यांच्यावर कलम 302, 452, 120 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अटक करून बाळापूर न्यायालयात आज हजर करण्यात आले. या वेळी प्रथम श्रेणी न्यायाधीश सुभाष गरड यांनी आरोपींना 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार इंगोले करत आहेत.


तिघाही बापलेकांची रात्र कोठडीत
दीपक आणि नंदू हे गजानन माळी यांची दोन मुले आहेत. वडिलोपाजिर्त शेतीवरील ताबा जात असल्यामुळे या तिघांचा राग अनावर झाला. या तिघांच्याही हातून चौघांची हत्या झाली. मंगळवारी या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांच्या चेहर्‍यावर अपराधभाव दिसत होता.


गजानन वासुदेव माळी यांच्याकडे 32 एकर शेती होती. त्यापैकी काही शेती अवैध सावकारीत गेली होती. उर्वरित उडीच एकर शेती त्यांनी भाऊबंद असलेल्या व डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठात नोकरीतून सेवानिवृत्त झालेल्या भगवंत माळी यांना 1998 मध्ये सात हजार रुपयांच्या मोबदल्यात लिहून दिली होती. गजानन माळी यांनी ही रक्कम व्याजासह परत केल्यावरही भगवंत माळी यांनी शेतीचा वाद न्यायालयात नेला. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने गजानन माळी यांच्या विरोधात निकाल दिला आणि जमीनीवरील ताबा सोडण्याचा त्यांना आदेश दिला होता. मात्र कवडीमोल दरात शेती गेल्याचे शल्य त्यास बोचत होते. सोमवारी शेतीच्या मशागतीवरुन गजानन माळी आणि भगवंत माळी यांच्या दोन मुलांमध्ये वादही झाला होता. त्याची तक्रार राजेश व योगेश माळी यांनी उरळ पोलिस ठाण्यात रविवारी दिली होती. ही तक्रार त्यांच्या जिव्हारी लागली होती. हातची वडिलोपाजिर्त शेतीही जाणार म्हणून त्यांनी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या वनमाला, चुलतभाऊ योगेश यांना शेतात गाठून त्यांना विरोध केला रागात कुर्‍हाडीने त्यांनी दोघांवर ही वार करुन त्यांची हत्या केली.