आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरांची पडझड, पिकांचे नुकसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पाऊस, गारपिटीने जिल्ह्यात कहर निर्माण झाला आहे. त्यामुळे घरांची पडझड झाली असून, पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी तेल्हारा तालुक्याला गारपिटीने झोडपले असून, यामध्ये 4000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, दानापूर परिसरात 975 व सौंदळय़ात 450 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. अकोटचे उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश हिंगे यांनी या भागाला भेट देऊन सव्र्हेचे आदेश दिले. गारपीट व पावसाने जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 77 हेक्टर पिकाचे नुकसान झाले, अशी माहिती नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाच्या सूत्रांनी दिली.
शनिवार, 8 मार्च रोजी तेल्हारा आणि बार्शिटाकळी तालुक्यात गारपीट झाली. दरम्यान, अकोट व बाळापूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे शेतीचे नुकसान तर झालेच शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले. गेल्या दोन दिवसांत झालेल्या गारपिटीने बार्शिटाकळीत 560 हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. वादळी वारा व गारपिटीने जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बार्शिटाकळी, अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर व पातूर तालुक्यातील शेतशिवारात पिकांची हानी झाली. यामध्ये 2 ते 4 मार्चपर्यंत 5,517 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. त्यात आता वाढ झाली असून, शनिवारी सकाळपर्यंत 560 हेक्टर पिकांचे बार्शिटाकळीत, तर तेल्हारा तालुक्यात 4,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 10 हजार 77 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
तेल्हार्‍यात मोठे नुकसान :
तेल्हारा तालुक्यात दानापूर व सौंदळा येथे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात चार हजार हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. दानापुरात सहा घरांची पडझड झाली आहे, असे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले.
सव्र्हे सुरू : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा सव्र्हे करण्याचे काम कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेमार्फत सुरू आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी सांगितले.
नुकसानीची पाहणी : बार्शिटाकळी तालुक्यातील गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात गारपिटीने नुकसान झाले. पीक परिस्थिती व नुकसानीची पाहणी शनिवार, 8 मार्च रोजी उपविभागीय महसूल अधिकारी लठाड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केली.
अकोला तालुका
रामकिशोर अहीर यांच्या डोक्यावर घराचा सज्जा पडल्याने ते जखमी झाले. या परिसरातील भाजीपाला व फळभाज्यांचे नुकसान झाले. पैलपाडा ते कौलखेड या रस्त्यावर बाभळींची झाडे पडल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. जोरदार वार्‍यामुळे आंब्याचा फुलोरा गळून पडला. शनिवारी तलाठी व कृषी सहायकांनी नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण केले, तर घरांच्या पडझडीचे गुरुवारी सर्वेक्षण करण्यात आले. या वेळी पोलिस पाटील सरपंच व महसूल विभागाचे कर्मचारी हजर होते.
पीक कर्जाचा प्रश्न : या परिसरातील रब्बी पिके भुईसपाट झाली असून, शेतकर्‍यांनी विविध बँकांकडून पीक कर्जाची उचल केली आहे. पीक कर्जाची परतफेड करणे सद्य:स्थितीत अशक्य आहे. अशा स्थितीत पीक कर्जावरील व्याज माफ करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आर्थिक मदत मिळावी : नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी पुरते हादरले आहेत.
तेल्हारा तालुका
नदीनाले तुडुंब झाले. मेघगर्जनेसह झालेल्या गारपिटीत 31 गावे बाधित झाली. यामध्ये तालुक्यातील दानापूर, सौंदळा, बादखेड, वारी, भैरवगड, चांगलवाडी, माळेगाव, बेलखेड, हिंगणी, गोर्धा, तळेगाव बाजार, माळपुरा, अडगाव, गाडेगाव, खापरखेड, थार, वारखेड, शेरी आदी गावांचा समावेश आहे. राणेगाव येथील विष्णू कुकडे यांच्या शेतात चराईसाठी बसलेले मेंढपाळांचे शंभराच्या वर मेंढरं जखमी झाले. या मेंढपाळांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दानापूर शिवारात सोंगणीसाठी आलेल्या आदिवासी मजुरांना चांगलाच फटका बसला. दरम्यान, दानापुरात उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष रौंदळे, जिल्हा परिषद सदस्य राजू खोने, पंचायत समिती सदस्या रार्जशी ठाकरे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
अकोट तालुका
जनजीवन विस्कळीत : सकाळी बरसलेल्या पावसाने मार्चमध्येही अकोटकरांना बोचर्‍या थंडीचा अनुभव दिला. शहरात अनेक ठिकाणी नागरिक रेनकोट घालून त्यांची कामे करताना दिसून आली, तर शेतमजुरांना कामासाठी भटकंती करावी लागली. काही महिला पोते डोक्यावर घेऊन लगबगीने कामावर जाताना दिसून आल्या. रस्त्यावर, खड्डय़ामध्ये, सखल भागात सर्वत्र पाणी साचले होते. ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरला होता. आठवडी बाजारात सर्वत्र चिखल दिसून आला.
बसस्थानकाची दुरवस्था
अकोट बसस्थानक परिसरात पावसाळय़ात नेहमी तळे साचलेले असते. शहरातील नाल्यांचे पाणी ओव्हरफ्लो होऊन ते पाणी बसस्थानकात येते, असे आगार व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. सध्या बसस्थानकासमोर पालिकेचा सिमेंट काँक्रीटचा हमरस्ता तयार होत आहे. या काळात स्थानकासमोर मुरूम टाकणे आवश्यक होते. परंतु, आजच्या पावसाने पुन्हा तळे तयार झाले. प्रवाशांना पुन्हा या समस्येचा सामना करावा लागत आहे.
छत्री, रेनकोटची विक्री अद्यापही सुरू
वर्षभर पाऊस पडणे सुरूच असल्याने छत्री व रेनकोटची विक्री अकोट येथील दुकानांमध्ये अद्यापही सुरू असल्याचे दिसून आले. पावसाळ्यात चढय़ा भावाने होणारी विक्री सध्या मात्र माफक दरात सुरू असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.