आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक सभागृहाच्या निर्मितीसाठी सरसावले शेकडो हात, हात उंचावून केला ठराव पारित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून सुरू झालेल्या लढ्याला आता गती आली असून, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर अकोला शाखेने घेतलेल्या ठरावास तब्बल शेकडो रसिकांनी हात उंचावून पारित केले. तसेच ६०० पेक्षा अधिक रसिकांनी स्वाक्षरी अभियानात सहभाग घेऊन सभागृहाचा प्रश्न मिटायलाच हवा, अशी आग्रही भूमिका घेतली.
मराठी नाट्य परिषदेच्या मलकापूर-अकोला शाखेतर्फे गुरुवारी सायंकाळी ओक सभागृहात ‘एकापेक्षा एक’ या धम्माल विनोदी कार्यक्रमाचे आयोजन झाले. या कार्यक्रमापूर्वी परिषदेच्या वतीने सभागृहाबाहेर स्टॉल लावून अकोल्यातील रखडलेल्या सभागृहासाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या वेळी जवळपास ४०५ रसिकांनी स्वाक्षरी करून ‘आम्हाला सभागृह हवेच’, असा आग्रह धरला. त्यानंतर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अ. भा. मराठी नाट्य परिषद मलकापूर-अकाेला शाखेचे प्रा. मधू जाधव यांनी सभागृहासाठी रसिकांसमोर ठराव मांडला. त्यांनी ठराव वाचून दाखवल्यानंतर सभागृहात उपस्थित रसिक प्रेक्षकांनी आवाजी बहुमताने तो पारित केला. तसेच कार्यक्रमादरम्यान सभागृहाचा प्रश्न सुटायलाच हवा, असा आग्रह रसिकांमध्ये दिसून आला. याप्रसंगी नाट्य परिषदेचे डॉ. गजानन नारे, अशोक ढेरे, प्रा. सचिन बुरघाटे, नीरज आवंडेकर, प्रा. ममता इंगोले, कपिल रावदेव आदींसह शहरातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

स्वाक्षरींसह पालकमंत्र्यांना साकडे

रसिकांच्या या शेकडो स्वाक्षरींसह जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन देऊन सभागृहासाठी साकडे घालण्यात येईल.'' अशोकढेरे, रंगकर्मी.

सभागृहाचा लढा होतो आहे गतिमान : अकोल्यात अद्ययावत सभागृह व्हावे, यासाठी दैनिक दिव्य मराठीने पुढाकार घेतला. त्याला अकोलेकर कलावंत, रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सुरुवातीला पदाधिकारी, प्रशासनाला निवेदन, त्यानंतर सभागृहाअभावी बाल कलावंतांनी मनपाच्या आवारात नाट्यप्रयोग करून केलेला निषेध बोलका ठरला. आता नाट्य परिषद मलकापूर-अकोला शाखेने घेतलेला आवाजी ठराव अन् स्वाक्षरी अभियानाने हा लढा गतिमान झाला आहे.