आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cultural News In Marathi, Gazal At Mothers Memories Festival, Divya Marathi

आई स्मृती महोत्सवाला गझल मैफलीची किनार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मंदिरापाशीच हिंसाचार झाला,
देव नसतो आज साक्षात्कार झाला,
रंग कर्जाने दिला शेतास आम्ही
देश मम टीव्हीत हिरवागार झाला’
या गझलकार सतीश दराडेंच्या ओळी, तर ‘बोलतोस मधाळ केवढा, काळजात मात्र गाळ केवढा, ग्यानबा तुका कुठे न गाडगे, संत आजचा टवाळ केवढा’ या संदीप वाकोडेंच्या ओळी अशा एकापेक्षा एक सरस गझलांनी समाज वास्तव दाखवले. रजधूळ मासिक परिवार अकोलाद्वारा आई स्मृती महोत्सवात 23 फेब्रुवारीला राज्यस्तरीय मराठी गझल उत्सव रंगला.
येथील रणपिसेनगरातील सम्यक संबोधी भवनात सायंकाळी सहाला झालेल्या गझल उत्सवाच्या अध्यक्षस्थानी विश्व गझल परिषद, औरंगाबादचे डॉ. शेख इकबाल मिन्ने होते. उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी अरुण शिंदे उपस्थित होते. व्यासपीठावर रजधूळ परिवाराच्या देवकाबाई देशमुख, डॉ. विजय दुतोंडे, बुलडाण्याच्या शिक्षणाधिकारी वैशाली ठग, गझलकार डॉ. गणेश गायकवाड, डॉ. सीमा तायडे, रमेशचंद्र धिरे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. आदेश आटोटे यांनी स्वागतगीत गायिले. प्रास्ताविकातून डॉ. विजय दुतोंडे यांनी मराठी गझल उत्सव आयोजनामागील हेतू विशद केला.
जिल्हाधिकारी अरुण शिंदे म्हणाले की, आईच्या स्मृतीत होऊ घातलेला गझल उत्सव आगळा-वेगळा आहे. आई परमेश्वराचे रूप असून, तिला दु:ख देऊ नका. ढगाआड गेलेला सूर्य उद्या पुन्हा दिसेल, मात्र आई परत मिळत नाही. गझलेविषयी बोलताना ते म्हणाले की, सुरेश भटांनी विदर्भात मराठी गझल रुजवली आणि भीमराव पांचाळे ती फुलवत आहेत. गझलेतून वंचितांचा हुंकार, जाणिवेचा नाद उमटतो. गझलांची संख्या वाढवण्यापेक्षा गुणवत्ता वाढवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी नरेंद्र नाईक यांच्या हस्ते ‘अलख’च्या द्वितीय आवृत्तीचे लोकार्पण झाले.
या वेळी बुलडाण्याच्या शिक्षणाधिकारी वैशाली ठग, देवकाबाई देशमुख, अनुराधा फाटक यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याताई बनाफर यांनी केले. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या गझलकारांचा मराठी मुशायरा रंगला.
यामध्ये डॉ. शेख इकबाल मिन्ने, संदीप वाकोडे, श्याम कावरे, रवींद्र जवादे, सतीश दराडे, प्रकाश मोरे, संदीप देशमुख, सुधीर कुबेर, प्रा. कविता डवरे आदींसह अनेक गझलकारांनी आपल्या
रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने अकोलेकरांची उपस्थिती होती.
आई स्मृती सोहळ्यात यंदापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना पाच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. यंदा अण्णासाहेब देशमुख गझलदीप पुरस्कार पुण्याचे सुधीर कुबेर, अनुसयाबाई राज्यस्तरीय स्त्रीगौरव पुरस्कार सांगलीच्या अनुराधा फाटक, र्शीराम दुतोंडे राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार हिंगोलीचे नरेंद्र नाईक, कॉम्रेड गं. पां. लोके राज्यस्तरीय सामाजिक कार्यगौरव पुरस्कार नेहरू पार्कचे बी. एस. देशमुख यांना, तर राजूभाऊ दुतोंडे राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कार औरंगाबादचे आदेश आटोटे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.